वृत्तसंस्था/ ऍमस्टरडॅम (हॉलंड)
निकोलस पूरनच्या नेतृत्वाखाली विंडीज क्रिकेट संघाने यजमान हॉलंडविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी मिळविली आहे. गुरूवारी झालेल्या या मालिकेतील दुसऱया सामन्यात विंडीजने हॉलंडचा 5 गडय़ांनी पराभव केला. विंडीजच्या ब्रँडन किंगला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हॉलंड संघाचा डाव 48.3 षटकांत 214 धावांत आटोपला. त्यानंतर विंडीजने 45.3 षटकांत 5 बाद 217 धावा जमवित विजय मिळविला.
हॉलंडच्या संघामध्ये सलामीच्या विक्रमजीत सिंगने 58 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 46, मॅक्स ओ दाऊदने 78 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 51, एडवर्ड्सने 89 चेंडूत 1 चौकारांसह 68 धावा जमविल्या. हॉलंडच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. विक्रमजीत सिंग आणि ओ दाऊद यांनी सलामीच्या गडय़ासाठी 101 धावांची भागिदारी केली. हॉलंडच्या डावात 2 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. विंडीजच्या अकिल हुसेनने 39 धावांत 4, जोसेफने 30 धावांत 2, फिलीप, वॉल्श आणि बॉनेर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीज संघातील किंगने 90 चेंडूत तीन षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 91, कार्टीने 66 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 43, शाय होपने 3 चौकारांसह 18, ब्रुक्सने 6, बॉनेरने 2 चौकारांसह 15, कर्णधार पूरनने 1 षटकारांसह 10, मेयर्सने 2 चौकारांसह 22 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 2 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. विंडीजने हा सामना 27 चेंडू बाकी ठेवून जिंकला. हॉलंडतर्फे डिलेडीने 46 धावांत 2 तर व्हॅन बेक, आर्यन दत्त आणि अहमद यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. विंडीजची एकवेळ स्थिती 5 बाद 99 अशी केविलवाणी झाली होती. त्यानंतर किंग आणि कार्टी यांनी सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 118 धावांची भागिदारी करीत विजय साकार केला.
संक्षिप्त धावफलक
हॉलंड 48.3 षटकांत सर्वबाद 214 (एडवर्ड्स 68, ओ दाऊद 51, विक्रमजीत सिंग 46, अकिल हुसेन 4-39, जोसेफ 2-30, वॉल्श, बॉनेर, फिलीप प्रत्येकी एक बळी), विंडीज 45.3 षटकांत 5 बाद 217 (ब्रँडन किंग नाबाद 91, कार्टी नाबाद 43, होप 18, बॉनेर 15, पूरन 10, मेयर्स 22, डिलेडी 2-46, व्हॅन बेक, आर्यन दत्त, एस. अहमद प्रत्येकी एक बळी.).