वृत्तसंस्था/ अँटीग्वा
सध्या पाकिस्तानचा महिला क्रिकेट संघ विंडीजमध्ये टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसऱया सामन्यात खेळताना विंडीजच्या दोन महिला क्रिकेटपटू अचानक मैदानात कोसळल्या आणि काही वेळ त्या बेशुद्धावस्थेत होत्या.
शुक्रवारी पाक आणि विंडीज यांच्यातील दुसरा टी-20 सामना झाला. या सामन्यात पावसाचा अडथळा आला होता. या सामन्यात दुसऱया डावात पाकचा संघ विंडीजच्या धावसंख्येच्या उद्दिष्टाकडे पाठलाग करीत होता. विंडीज संघातील वेगवान गोलंदाज चिनेली हेन्री आणि चिडेन नेशन या दोन महिला क्रिकेटपटू विविध दोन घटनामध्ये अचानकपणे मैदानात कोसळल्या. लागलीच त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. विंडीजच्या या दोन्ही महिला क्रिकेटपटूंची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टारांनी सांगितले. मात्र या दोन्ही महिला क्रिकेटपटू अद्याप शुद्धीत आल्या नाहीत, असे या रूग्णालयातील प्रवक्त्याने सांगितले. या सामन्यात विंडीज संघाकडून दोन बदली खेळाडूंना मैदानात उतरविण्यात आले. डकवर्थ लेवीस नियमानुसार विंडीज संघाला 7 धावांनी विजय म्हणून घोषित करण्यात आले.