वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
यजमान न्यूझीलंड आणि विंडीज यांच्यात कसोटी आणि टी-20 मालिका न्यूझीलंडमध्ये खेळविल्या जाणार आहेत. उभय संघातील टी-20 मालिकेला 27 नोव्हेबरपासून ऑकलंडमध्ये प्रारंभ होणार आहे. क्रिकेट न्यूझीलंडने मंगळवारी न्यूझीलंड संघाची घोषणा केली. निवड समितीने कसोटी आणि टी-20 मालिकेसाठी वेगवेगळे संघ निवडले आहेत. दरम्यान टी-20 मालिकेसाठी कर्णधार केन विलीयमसन आणि टेंट बोल्ट यांना विश्रांती दिली आहे. कसोटी मालिकेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी या दोघांनी टी-20 मालिकेत खेळणार नाहीत.
न्यूझीलंडच्या टी-20 संघात दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला देवॉन कॉनवे या एकमेव नव्या चेहऱयाला संधी देण्यात आली आहे. आयसीसीच्या कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत उभय संघांत दोन कसोटी सामने डिसेंबर महिन्यात होणार आहेत. आयसीसीच्या या स्पर्धेत न्यूझीलंडला अंतिम फेरीत प्रवेश मिळविण्याची संधी निर्माण झाली असल्याने विलीयमसन आणि बोल्ट यांनी कसोटी क्रिकेटवर आपले लक्ष अधिक केंद्रीत करण्याचे ठरविले आहे. नवोदित कॉनवे 2017 साली न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाला. त्यानंतर त्याने 2018 आणि 2019 साली सलग दोनवेळा राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कारही मिळविला आहे. न्यूझीलंडच्या टी-20 संघात मुनेरोच्या जागी कॉनवेला निवडण्यात आले आहे.
न्यूझीलंड टी-20 संघ- टीम साऊदी (कर्णधार), बेनेट, कॉनवे, फर्ग्युसन, ग्युपटिल, जेमिसन, मिचेल, निश्चॅम, फिलीप्स, सँटेनर, सौधी,सिफर्ट, रॉस टेलर, (ब्रेसवेल, कुगेलिन आणि मार्क चॅपमन हे या मालिकेतील तिसऱया सामन्यात जेमिसन, सौधी आणि रॉस टेलर यांच्या जागी खेळणार आहेत)
न्यूझीलंड कसोटी संघ- केन विलीयमसन (कर्णधार), ब्लंडेल, बोल्ट, ग्रॅण्डहोम, जेमिसन, लेथम, निकोल्स, अजिझ पटेल, साऊदी, रॉस टेलर, वेग्नर, वेटलिंग आणि यंग.