वृत्तसंस्था/ अँटिग्वा
यजमान विंडीज आणि लंका यांच्यातील पहिली क्रिकेट कसोटी गुरुवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी अनिर्णित अवस्थेत राहिली. बॉनरच्या नाबाद शतकामुळे विंडीजला हा सामना अनिर्णित राखता आला. आता उभय संघातील दुसरी आणि शेवटची कसोटी येत्या सोमवारपासून अँटिग्वामध्येच खेळविली जाणार आहे. विंडीजच्या बॉनरला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात लंकेने पहिल्या डावात 169 धावा जमविल्यानंतर विंडीजने पहिल्या डावात 271 धावा जमवित 102 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर लंकेने दुसऱया डावात दमदार फलंदाजी करत 476 धावांचा डोंगर उभा केला. विंडीजला निर्णाय विजयासाठी लंकेने 375 धावांचे कठीण आव्हान दिले होते. विंडीजने 1 बाद 34 या धावसंख्येवरून शेवटच्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि 100 षटकात त्यांनी 4 बाद 236 धावा जमवित हा सामना अनिर्णित राखला. गेल्याच महिन्यात आपल्या वयाच्या 32 व्या वषी कसोटी पदार्पण करणाऱया बॉनरने कसोटीतील आपले पहिले शतक झळकविले. त्याने 274 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह नाबाद 113 धावा झळकविल्या. मेयर्सने 113 चेंडूत 5 चौकारांसह 52 तसेच कर्णधार पेग ब्रेथवेटने 23, कॅम्पबेलने 2 चौकारांसह 11, ब्लॅकवूडने 4 धावा जमविल्या. होल्डरने 4 चौकारांसह नाबाद 18 धावा केल्या. लंकेतर्फे व्ही. फर्नांडो आणि एम्बुल्डेनिया यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. या सामन्यातील शेवटच्या दिवशी उपाहारापर्यंत विंडीजने 2 बाद 91 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर बॉनर आणि मेयर्स यांनी चहापानापर्यंतच्या दुसऱया सत्रात 90 धावांची भर घातली होती.
संक्षिप्त धावफलक
लंका प. डाव- 169, विंडीज प. डाव- 271, लंका दु. डाव- 476, विंडीज दु. डाव 100 षटकात 4 बाद 236 (बॉनर नाबाद 113, मेयर्स 52, ब्रेथवेट 23, कॅम्पबेल 11, ब्लॅकवूड 4, होल्डर नाबाद 18, व्ही. फर्नांडो 2/73, एम्बुल्डेनिया 2/62)