नगराध्यक्ष संजू परब यांचा मनोदय: पक्षीय राजकारण नको!
वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी शहराचा, जनतेचा विकास हेच आपले ध्येय आहे. या विकास कामांत पक्षीय राजकारण आणणार नाही. विकास निधीसाठी आमदार दीपक केसरकर यांची मदत घेऊ, असे नूतन नगराध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी नूतन सभापती ऍड. परिमल नाईक, नासीर शेख, राजू बेग, समृद्धी विर्नोडकर, उत्कर्षा सासोलकर, दीपाली भालेकर, सुधीर आडिवरेकर, उदय नाईक, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, आनंद नेवगी उपस्थित होते.
परब म्हणाले, सावंतवाडी शहराचा विकास करणे, हेच माझे ध्येय आहे. आता राजकारण मुळीच करणार नाही. शहरातील जनतेला जो विकास हवा आहे, तसा विकास साधण्यासाठी कुठलेही पक्षीय राजकारण आणणार नाही. विकासकामात राजकारण आणणे उचित नाही. तशी माझी वृत्ती नाही. सावंतवाडीची जनता मला लहानपणापासूनच ओळखते. त्यामुळे प्रत्येक प्रभागात समान विकास हेच उद्दिष्ट आहे.
दीपक केसरकरांचे सहकार्य घेणार!
परब म्हणाले, सावंतवाडी शहरात जे प्रकल्प सुरू आहेत, बंद आहेत आणि ज्या प्रकल्पासाठी निधी मंजूर आहे व निधीची आवश्यकता आहे, त्यासाठी वेळ पडल्यास दीपक केसरकर यांचे सहकार्य घेणार आहे. केसरकर यांना या शहराचा अनुभव आहे. त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव पाहता मी निश्चितपणे राजकारण न आणता त्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. पालिकेतील सर्व नगरसेवक व अधिकारी, कर्मचारी यांचेही सहकार्य घेऊन काम करणार आहे.