किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे जागतिक मुद्रण दिन
प्रतिनिधी / बेळगाव
विज्ञानाच्या शोधामुळे अलीकडे मुद्रण क्षेत्रात प्रचंड बदल झाले आहेत. त्यामुळे छपाईचे कामदेखील वेळेत आणि सोयीस्कर झाले आहे. इतर देशांबरोबर देशदेखील मुद्रण क्षेत्रात पुढे येत आहे. मुद्रण पद्धतीत वापरल्या जाणाऱया उपकरणांमध्ये कागद, शाई आणि मुद्रण प्रतिमा महत्त्वाच्या आहेत. विज्ञानाच्या उलथापालथीमुळे मुद्रणक्षेत्र एका वेगळय़ा उंचीवर पोहोचले आहे, असे विचार तरुण भारतचे समूहप्रमुख आणि सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी मांडले.
बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनतर्फे गुरुवारी जागतिक मुद्रण दिन साजरा करण्यात आला. कोनवाळ गल्ली येथील लोकमान्य रंगमंदिरामध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी किरण ठाकुर बोलत होते. व्यासपीठावर बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्रीधर जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र भातकांडे, सचिव शाम मांगले, संतोष होरटीकर आदी उपस्थित होते. प्रारंभी किरण ठाकुर यांच्या हस्ते मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
किरण ठाकुर म्हणाले, आपण सोशल मीडिया क्षेत्रात केलेली प्रगती ही मुद्रण केलेचा उत्तम नमुना आहे. ज्या क्षेत्रात आपण काम करतो, त्या क्षेत्राशी आपले आयुष्य जोडले जाते. त्यामुळे येणाऱया आव्हानांना समर्थपणे सामोरे गेले पाहिजे. गेल्या 70 ते 80 वर्षांत मुद्रण क्षेत्रात बरेच बदल झाले आहेत. देशातील 4 लाखांहून अधिक लोक मुद्रण क्षेत्रात वावरतात. त्यामुळे मुद्रण क्षेत्र अनेकांचे उपजिविकेचे साधन आहे. मुद्रण क्षेत्रात प्रचंड प्रमाणात बदल होत असून जर्मनी या क्षेत्रात पुढे आहे. याबरोबरच युवापिढीनेही या क्षेत्रात स्थिर व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्रीधर (बापू) जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासह अन्य क्षेत्रातील निधन झालेल्या मंडळींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्री लिपीची चित्रफितीद्वारे अधिक माहिती मुद्रकांना देण्यात आली. याप्रसंगी सभासद अशोक धोंड, सतीश जाधव, नंदु देशपांडे, रघुनाथ राणे, अजित कोळेकर, विकास सांगावकर, सर्वज्ञ कपिलेश्वरी यांसह मुद्रक उपस्थित होते.