जीम, स्विमिंग पूलही बंद : चित्रपटगृहांमध्ये 50 टक्क्यांची अट : कोरोना संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर कठोर मार्गसूची
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोना संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर नियम असणारी मार्गसूची जारी केली असून विद्यागमसह सहावी ते नववीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमितपणे सुरू ठेवण्यात येत आहेत. राज्यातील जीम, स्विमिंग पूल पूर्णपणे बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तर बसमध्ये नियोजित आसन क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना प्रवेश न देण्याची सूचना करण्यात आली आहे. मागील आठवडय़ात जारी केलेल्या आदेशाप्रमाणे कोणत्याही प्रकारचे आंदोलन, संप, रॅली काढता येणार नाही. यात्रा, उत्सवांवरील निर्बंधही पुढील आदेशापर्यंत जैसे थेच राहणार आहेत.
शेजारील महाराष्ट्र, केरळमध्ये कोरोना रुग्णवाढीमुळे राज्य सरकारने खबरदारी घेत शुक्रवारी दुपारी राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रविकुमार यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक घेऊन राज्यात कठोर नियम जारी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, राज्यात लॉकडाऊन, सेमी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू जारी न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
बेंगळूर, धारवाडसह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असणाऱया आठ जिल्हय़ांतील चित्रपटगृहांमध्ये केवळ 50 टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची अट राज्य सरकारकडून घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे येथील बार, पब, क्लब, रेस्टॉरंटमध्ये देखील एकूण क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्याची सूचना करण्यात आली आहे. जर या नियमांचे उल्लंघन केल्यास संसर्गजन्य रोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
धार्मिक स्थळांमध्ये व्यक्तिगत प्रार्थना, पूजेसाठी मुभा देण्यात आली आहे. मात्र, सामूहिकपणे किंवा एकत्रित येऊन प्रार्थना, धार्मिक विधी करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यात्रा, उत्सवांचे आयोजन करण्यासही प्रतिबंध घालण्यात आले आहेत. वाढदिवस, कार्यक्रम, सभा-समारंभांसाठी यापूर्वी निश्चित केलेल्या प्रमाणातच लोकांना प्रवेश देण्याची अट घालण्यात आली आहे.
मुख्य आयुक्त, बेंगळूर महापालिकेसह, सर्व जिल्हाधिकारी, संबंधित सर्व प्राधिकारणांनी या मार्गसूचीच्या पालनासंबंधी स्थानिक पातळीवर कार्यवाही करावी. त्याची अंमलबजावणी होत असल्यासंबंधीची खातरजमा करून घ्यावी, असे आदेशपत्रकात उल्लेख करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा कठोर मार्गसूची जारी केली आहे. राज्यात लॉकडाऊन, सेमी लॉकडाऊन, नाईट कर्फ्यु जारी करणार नसल्याचे राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रविकुमार यांनी स्पष्ट केले आहे. विधानसौध येथे आरोग्य खाते आणि इतर खात्याच्या अधिकाऱयांची बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
अपार्टमेंटमध्येही लसीकरण करणार
लॉकडाऊनपेक्षा कोरोना नियंत्रणासाठी नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी जागृती करण्यात येईल. संसर्गजन्य रोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करणे, औद्योगिक प्रदेश आणि अपार्टमेंटमध्ये लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन, नियमांचे पालन करण्याची सूचना केंद्र सरकारने दिली असून राज्यात देखील त्याची काटेकोर अंमलबजावणीसाठी उपाययोजना केल्या जातील, असे ते म्हणाले.
लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची सूचना देण्यात आली आहे. सरकारनेच घरोघरी जाऊन लस देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अधिक लोकवस्ती असलेल्या भागात लसीकरण अभियान जलद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अलिकडेच यात्रा, उत्सव, आंदोलनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. आता विद्यागमसह शाळांमध्ये सहावी ते नववीपर्यंतचे नियमितपणे भरणारे वर्गही स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पी. रवीकुमार यांनी स्पष्ट केले.
देशभरातील 9 राज्यात शाळा बंदचा निर्णय
देशभर कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्यामुळे आतापर्यंत 9 राज्यांनी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बहुतांश राज्यात नववीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, मध्यप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि पुदुच्चेरी यासारख्या राज्यात सरकारने पुन्हा शाळा बंद केल्या आहेत. गुजरातमध्ये 8 महापालिका क्षेत्रात शाळा बंद आहेत. स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून राज्यांना करण्यात आल्या आहेत.
नवी कोविड मार्गसूची
- विद्यागमसह 6 वी ते 9 वी पर्यंतचे वर्ग स्थगित. दहावी, अकरावी आणि बारावीचे वर्ग मात्र नियमित सुरू राहणार. पण हजेरीची सक्ती नाही
- उच्च शिक्षण महाविद्यालये आणि व्यावसायिक कोर्स प्रशिक्षण मंडळ/ विद्यापीठांच्या परीक्षा देणारे आणि वैद्यकीय शिक्षणाचे वर्ग वगळता इतर सर्व वर्ग स्थगित.
- वसती शाळा आणि बोर्डिंग असणाऱया शाळांमधील दहावी ते बारावी बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी, उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण कोर्स, वैद्यकीय वर्ग वगळता सर्व वर्ग स्थगित.
- धार्मिक स्थळांमध्ये वैयक्तिक प्रार्थनेला मुभा. पण, सामूहिकपणे सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांवर निर्बंध
- अपार्टमेंट, कॉम्प्लेक्समधील किंवा सामूहिक निवासस्थानांमधील तसेच इतर पसर्व जीम, पार्टी हॉल, क्लब हाऊस, स्विमिंग पूल बंद.
- कोणत्याही प्रकारच्या रॅली, आंदोलने, संपावर निर्बंध
- सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत नियोजित आसन क्षमतेपक्षा अधिक प्रवाशांना प्रवेश नाही
- शॉपिंग मॉल, बंदीस्त मार्केट आणि डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये मास्क, शारीरिक अंतर, हॅन्ड सॅनिटायझर, हॅन्ड वॉशचा वापर सक्तीचा. नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई.
- सार्वजनिक ठिकाणी धार्मिक आचरण आणि यात्रा महोत्सव, मेळा, एकत्र येण्यावर निर्बंध.
- विविध सभा/समारंभामध्ये प्रवेश देण्याबाबत 12 मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार मर्यादित प्रवेश.
- कार्यालये व इतर कामांच्या ठिकाणी शक्यतो घरातूनच काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) व्यवस्था करण्यास प्राधान्य द्यावे
- बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, म्हैसूर, गुलबर्गा, मंगळूर, उडुपी, बिदर आणि धारवाड जिल्हय़ांमध्ये चित्रपटगृहांमध्ये 50 टक्क्यांपर्यंत प्रेक्षकांना प्रवेश. एक आसन सोडून एक आसनावर बैठक व्यवस्था करणे
- बेंगळूर शहर, बेंगळूर ग्रामीण, म्हैसूर, गुलबर्गा, मंगळूर, उडुपी, बिदर आणि धारवाड जिल्हय़ांमध्ये पब, बार, क्लब, रेस्टॉरंटमध्ये कमाल ग्राहक क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश
- कोविड मार्गसूचीचे उल्लंघन करणारे पब, बार, क्लब, रेस्टॉरंट कोविड संसर्ग संपुष्टात येईपर्यंत बंद करणार