आमदार सुदिन ढवळीकर यांची सूचना
वार्ताहर / मडकई
लॉकडाऊनमुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षाला जूनपासून सुरुवात करणे शक्य नसले तरी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी शाळा सुरु करताना विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा गांभीर्याने विचार करावा. तसेच ग्रामीण भागातील नेटवर्कची समस्या लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षण पद्धती रद्दबादल करावी. योग्य असे शैक्षणिक धोरण राबवून विद्यार्थ्यांचे हित लक्षात घ्यावे, असे मत माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी मांडले आहे.
यंदाचे शैक्षणिक वर्ष नेमके केव्हा सुरु होईल याबाबत पालक व विद्यार्थी संभ्रमात आहेत. सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग सुरु केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी तणावाखाली आले आहेत. कारण गोव्यातील बऱयाच भागामध्ये नेटवर्क नसल्याने ऑनलाईन संपर्क होऊ शकत नाही. ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरु करून शिक्षण खाते व सरकार विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत असल्याचा आरोप सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. अनेक गरीब विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन, लॅपटॉप किंवा संगणक संच नाहीत. मडकई मतदार संघातील कित्येक पालक व विद्यार्थ्यांनी आपल्याकडे अशी कैफियत मांडल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
ज्या गरीब पालकांना आपल्या मुलांना पुस्तके, गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य पुरविताना जड जाते, ते मुलांना मोबाईल स्मार्टफोन किंवा लॅपटॉप कुठून आणून देतील, असा प्रश्न ढवळीकर उपस्थित केला आहे. या ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे अशा पालकांची चिंता वाढली आहे. केवळ मडकई मतदार संघातील पालकांची ही स्थिती नसून गोव्याच्या अन्य भागातही हीच परिस्थिती आहे. फोंडा, पेडणे, सावर्डे, डिचोली, काणकोण, सत्तरी अशा बहुतेक तालुक्यामध्ये सध्या नेटवर्क मिळत नाही. सरकारने कुठलाही शैक्षणिक निर्णय घेताना शाळा व्यवस्थापन समित्यांशी सल्ला मसलत करणे आवश्यक आहे, असे ढवळीकर म्हणाले.
दरम्यान आडपई गावात कोरोनाबाधीत रुग्ण सापडल्यानंतर आपण तातडीने फोंडा उपजिल्हा इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुवलेकर, डॉ. बोरकर व फोंडय़ाचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे यांच्याशी संपर्क साधून योग्य पावले उचलण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्याशी फोनवर चार वेळा संपर्क साधला. मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क झाला व आपण त्यांना आवश्यक सूचना केल्याचे आमदार ढवळीकर यांनी सांगितले.