जाचक अटींमुळे अद्याप विद्यार्थी दूरच
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील 8 महिन्यांपासून बंद असणारी महाविद्यालये मंगळवारी खुली करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. आदेशानुसार बेळगावमध्येही पदवी महाविद्यालयांसोबतच इंजिनिअरिंग व डिप्लोमा कॉलेज सुरू करण्यात आली. परंतु पहिल्याच दिवशी महाविद्यालयांचा परिसर सुनासुना होता. कोरोना चाचणीची सक्ती केल्यामुळे विद्यार्थी कॉलेजांमध्ये फिरकलेच नसल्याचे दिसून आले. आरोग्य खात्याच्यावतीने महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारीवर्गाची स्वॅब तपासणी करण्यात आली.
मार्च महिन्यापासून कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारच्या नियमावलीनुसार ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. ऑनलाईन शिक्षणामध्ये स्मार्टफोन व नेटवर्क नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. तासन्तास ऑनलाईन शिक्षण घेतल्यामुळे आरोग्याच्या समस्याही भेडसावू लागल्या होत्या. यामुळे महाविद्यालये नियमित केव्हा सुरू होणार असा प्रश्न पालकांमधून विचारला जात होता. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार मंगळवार दि. 17 पासून पुन्हा कॉलेज सुरू करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार बेळगावमधील महाविद्यालये सुरू करण्यात आली.
सरकारने महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी नियमावलीचे धोरण स्पष्ट करण्यात आले नसल्यामुळे गोंधळ निर्माण झाला. कोरोना चाचणीची सक्ती केल्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थी फिरकलेच नाहीत. महाविद्यालयांनी सर्वती तयारी करूनदेखील विद्यार्थी नसल्यामुळे बसून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यामुळे सध्या तरी ऑनलाईन क्लास सुरू राहतील, अशी शक्मयता वर्तविली जात आहे.
पालक-विद्यार्थी संभ्रमात
महाविद्यालयांकडून पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली. कोरोना चाचणी नेमकी कोठे करायची याबाबतचे स्पष्ट आदेश नसल्यामुळे पालक व विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत. यामुळे कोरोना चाचणीबाबत योग्य माहिती मिळत नाही, तोवर ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याची तयारी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.
महाविद्यालयातर्फेही विद्यार्थ्यांची तपासणी : डॉ. एस. एम. पाटील (प्राचार्य, भाऊराव काकतकर महाविद्यालय)
कॉलेज सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला, परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती अत्यंत कमी आहे. कोरोना चाचणीची सक्ती, पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र व बसपास नसल्याने विद्यार्थी महाविद्यालयापर्यंत पोहचलेले नाहीत. विद्यार्थ्यांनी संभ्रम करून न घेता जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून कोरोना चाचणी करायची आहे. अन्यथा महाविद्यालयातर्फेही विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती डॉ. एस. एम. पाटील यांनी दिली.
एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी : डॉ. संजय डुमगोळ (तालुका आरोग्य अधिकारी)
कॉलेजमधील प्राध्यापकांची कोरोना तपासणी करण्यासाठी 15 टीम तयार करण्यात आल्या आहेत. पहिल्या दोन-तीन दिवसांमध्ये कॉलेजमध्ये जाऊन प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱयांची तपासणी केली जाणार आहे. शहर व तालुक्मयातील एकूण 22 प्राथमिक आरोग्य केंद्र व एका सीएसी केंद्रावर कोरोना तपासणी सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी चाचणीसाठी कॉलेजमध्ये संपर्क साधल्यास त्यानंतर एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.