ऑनलाईन टीम / मुंबई :
नागपूर आणि अकोला विधानपरिषद निवडणुकांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार आणि माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस समर्थित मंगेश देशमुख यांचा पराभव केला. तर अकोला-बुलढाणा-वाशिम जागेवर भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांना जोरदार धक्का दिला.
राज्यातील विधानपरिषदेच्या 6 जागांपैकी 4 जागा बिनविरोध निवडून आल्या. मात्र, नागपूर आणि अकोला जागांसाठी एकमत होऊ न शकल्याने या जागांसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. आज या निवडणुकांची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये दोन्हीही जागांवर भाजपने बाजी मारली आहे. 554 मतदान असलेल्या नागपूर विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. तर काँग्रेस समर्थित मंगेश देशमुख यांना 186 मते मिळाली.
तर अकोला वाशिम आणि बुलढाणा मतदारसंघात 822 मतदान होते. भाजपचे वसंत खंडेलवाल यांना 443 मते मिळाली. बाजोरिया यांना 334 मते मिळाली. तर 31 मते बाद झाली.