प्रतिनिधी/ पणजी
राज्यात कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने वाढत चालल्याने त्याचा परिणाम विधानसभा अधिवेशनातही दिसून येणार आहे. 27 जुलैपासून सुरू होणाऱया पावसाळी अधिवेशनात लोकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचबरोबर अधिकाऱयांसाठीही एसओपी जाहीर केला जाणार असल्याचे सभापती राजेश पाटणेकर यांनी स्पष्ट केले आहे, मात्र विधिमंडळ सदस्यांच्या आसन व्यवस्थेत कोणताही बदल होणार नाही.
प्रत्येक अधिवेशनाला पास घेऊन प्रत्येक गॅलरीत लोक उपस्थिती लावायचे आणि अधिवेशनाचा आनंद घ्यायचे. मात्र यावेळी प्रथमच कोरोनामुळे प्रेक्षकांना विधानसभा अधिवेशनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. 10 दिवस चालणारे हे अधिवेशन पहिल्यांदाच प्रेक्षकांविना चालणार आहे.
पत्रकार गॅलरीत एसओपी पाळून त्यानुसार आसन व्यवस्था व सुविधा निर्माण केल्या जातील. गरज भासल्यास दोन गॅलरीमध्ये पत्रकारांसाठी व्यवस्था केली जाणार आाहे. मंत्री, आमदारांच्या आसन व्यवस्थेत कोणतेही बदल केले जाणार नाहीत. कारण विधिमंडळ सदस्यांच्या आसन व्यवस्था काही अंतर राखूनच केलेली आहे. 2 जुलैपासून सदस्यांचे विधानसभा अधिवेशनाचे प्रश्न स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. प्रश्नोत्तर काळ व अन्य कार्यक्रमात बदल होणार नसल्याचे सभापती पाटणेकर यांनी स्पष्ट केले आहे. अधिवेशनकाळात उपस्थिती लावणारे शासकीय अधिकारी जवळ जवळ बसतात. त्यांच्यासाठी येत्या दिवसात एसओपी जारी केला जाणार असल्याचे पाटणेकर यांनी सांगितले.