शहरात विनापरवाना व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास ः दोन दिवसांत आठ व्यावसायिकांवर कारवाई
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिकेकडून व्यवसाय परवाना घेण्याची सूचना करूनही व्यावसायिक परवाना घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शहराच्या विविध भागात फेरफटका मारून महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी व्यवसाय परवान्याची चौकशी केली. बहुतांश व्यवसाय विनापरवाना असल्याने दंडात्मक कारवाई करून दोन दिवसांत 22 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला.
शहरात व्यवसाय करण्यासाठी मनपाकडून परवाना घेणे बंधनकारक आहे. मात्र व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. व्यवसाय परवान्याबाबत यापूर्वी महापालिका अधिकाऱयांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नव्हती. मागील दोन वर्षात विनापरवाना व्यावसायिकांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे विनापरवाना व्यावसायिकांची संख्या वाढली आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारीपदी कायमस्वरुपी दाखल झालेल्या डॉ. संजय डुमगोळ यांनी व्यवसाय परवान्यासह विविध माहिती घेण्यास प्रारंभ केला आहे. शहरात फेरफटका मारून स्वच्छतेबरोबरच व्यवसाय परवान्याची चौकशी चालविली आहे. मागील चार दिवसांत किर्लोस्कर रोडसह विविध परिसरात फेरफटका मारून 25 व्यावसायिक आस्थापनांना भेटी देऊन व्यवसाय परवान्याची चौकशी केली होती. पण काही व्यावसायिकांनी मनपाकडून व्यवसाय परवाना घेतला नसल्याचे आढळून आले. तसेच काही व्यावसायिकांनी व्यवसाय परवान्याचे नुतनीकरण केले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे व्यवसाय परवाना नुतनीकरण न केलेल्या व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर व्यवसाय परवाना नसलेल्यांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
या मोहिमेमध्ये महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ, व्यवसाय परवाना विभागाचे क्लार्क आनंद पिंपरे, महसूल निरीक्षक संतोष कुरबेट आदींसह मनपाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
7 दिवसांच्या आत व्यवसाय परवाना घेण्याची सूचना
शुक्रवारी किर्लोस्कर रोड परिसरातील व्यावसायिक आस्थापनांना भेट देऊन व्यवसाय परवान्याची चाचपणी केली. यावेळी काही व्यावसायिकांकडे परवानाच नसल्याचे आढळून आले. त्यामुळे आठ व्यावसायिकांकडून दंड वसूल करण्यात आला. विविध ठिकाणाच्या विनापरवाना व्यावसायिकांकडून शुक्रवारपर्यंत 22 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच नोटीस बजावून 7 दिवसांच्या आत व्यवसाय परवाना घेण्याची सूचनाही करण्यात आली.