डॉ. प्रभाकर कोरे यांची माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
केएलई अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिचर्स सेंटरमध्ये ऍडव्हान्स सिम्युलेशन सेंटर आणि क्लिनिकल स्किल्स लॅबचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. केएलई संस्थेचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
यावेळी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, रजिस्ट्रार डॉ. व्ही. ए. कोठीवाले, डॉ. अभिजीत गोगटे, डॉ. आर. एस. मुधोळ आदी उपस्थित होते. डॉ. प्रभाकर कोरे पुढे म्हणाले, आजवर अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होत होता. आता बेंगळूर, मंगळूरनंतर केएलईमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त सिम्युलेशन सेंटर व क्लिनिकल स्किल्स लॅब सुरू होत आहे.
वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी हे अत्याधुनिक लॅब उपयुक्त ठरते. 15 कोटीचे हे प्रकल्प असून सध्या यासाठी 7 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांबरोबरच भविष्यात पोलीस, अग्निशामक दलाच्या जवानांनाही या सिम्युलेशन सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्याचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित राहणार आहेत. केएलई कॅम्पसमध्ये अमित शहा पाऊण तास राहणार आहेत.
आजारी रुग्णावर उपचार करताना कशापद्धतीने उपचार करायचे, प्रसुती, शस्त्रचिकित्सा आदींबरोबरच वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक सर्व विभाग या सिम्युलेशन सेंटरमध्ये आहेत. संगणक आधारित अत्याधुनिक व्यवस्थेत विद्यार्थ्यांना रोगनिदान व रुग्णसेवेबद्दल अचूक माहिती देता येते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन करण्यात येणार आहे. सिम्युलेशन सेंटरमधील प्रशिक्षणामुळे उपचारांची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच रुग्णांच्या सुरक्षिततेवरही भर देता येणार आहे.