तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
मास्क न वापरणाऱ्या शहरातील दुकानदार व नागरीकांवर बुधवारी दि.३ रोजी नगरपालिकेने कारवाईचा बडगा उचलत सुमारे ८ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नगरपालिका आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांच्या पथकाने शहरातील बाजारपेठेत पाहणी केली असता अनेक दुकानदार तोंडाला मास्क न लावता व्यापार करत असल्याचे आढळून आले. मास्क न वापरणाऱ्या आठ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करुन नगरपालिकेने ८ हजारांचा दंड वसूल केला आहे.
ही कारवाई आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण व किरण खवळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता दूत अविनाश गोडगे,विक्रम बागल,आकाश गोडगे,सागर बागल,दत्ता गायकवाड,संदीप ढावरे यांच्या पथकाने केली. तरी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क बांधावा ,सोशल डिस्टन्सचे नियम पाळावे,कामाशिवाय बाहेर पडू नये,गर्दी करू नये,सॅनिटाईझरचा वापर करावा असे आवाहन मुख्याधिकारी समीर भुमकर यांनी केले आहे.