12 विरोधी नेत्यांनी पाठविले पंतप्रधान मोदींना पत्र
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने देशात सर्वांना कोरोनाची लस विनामूल्य उपलब्ध करावी आणि नव्या संसदभवनाच्या निर्मितीचा प्रकल्प स्थगित करून तो पैसा कोरोना उदेकाविरोधात उपयोगात आणावा, अशी मागणी 12 विरोधी पक्षांनी केली आहे. त्याचप्रमाणे देशातील बेरोजगारांना प्रतिमहिना 6 हजार रुपये द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांचे पत्र पाठविण्यात आले आहे.
12 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हे संयुक्त पत्र लिहिले आहे. या नेत्यांमध्ये काँगेस नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँगेसचे नेते शरद पवार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे, तृणमूल काँगेस नेत्या ममता बॅनर्जी, द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, नॅशनल कॉन्फरन्स नेते फारुख अब्दुल्ला, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा आणि मार्क्सवादी नेते सीताराम येच्युरी यांचा समावेश आहे, अशी माहिती देण्यात आली.
परिस्थिती आव्हानात्मक
देशातील परिस्थिती सध्या आव्हानात्मक आहे. कोरोना अनियंत्रितरित्या वाढत आहे. केंद्र सरकारने वेळ न घालवता यावर निर्णायक उपाययोजना करावी. यासाठी आवश्यक ते सर्व स्रोत उपयोगात आणावेत. लोकांचे जीव वाचणे महत्वाचे आहे, अशा अर्थाचा आशय या पत्रात असल्याचे सांगितले गेले आहे.
एकंदर 9 सूचना
कोरोनाची विनामूल्य लस आणि बेरोजगारांना प्रतिमहिना 6 हजार रूपये याशिवाय आणखी सात सूचना या पत्रात करण्यात आल्या आहेत. देशातील कोरोना लसीचा तुटवडा नाहीसा करण्यासाठी प्रयत्न करावेत, लसीचे देशांतर्गत उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करावा, यासाठी अनुमतीपत्राची अनिवार्यता स्थगित करावी, गरीब आणि गरजवंतांसाठी विनामूल्य धान्य देण्यात यावे, अर्थसंकल्पात लसीकरणासाठी निर्धारित केलेल्या 35 हजार कोटी रुपयांचा उपयोग करावा, संपूर्ण देशात सर्वंकष लसीकरण कार्यक्रम हाती घ्यावा, पीएम केअर्स निधी आणि खासगी निधींचा उपयोग कोरोना दूर करण्यासाठी व्हावा इत्यादी सूचनांचा या पत्रात आहे.