मुंबई
भारतीय सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी विप्रोच्या सीईओपदी थेरी डेलापोर्टे यांची निवड करण्यात आली आहे. सध्या ते या कंपनीवर सीईओ तसेच व्यवस्थापकीय संचालकपद सांभाळणार आहेत. यापूर्वी ते फ्रान्समधील केपजेमिनी ग्रुपचे सीओओ (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) होते. केपजेमिनी ही सल्लागार व तंत्रज्ञान क्षेत्रातली नामांकीत कंपनी म्हणून परिचीत आहे. या आधी विप्रोचे सीईओ असणाऱया अबिदली निमुचवाला यांनी जानेवारीत पदाचा राजीनामा दिला होता.
गुगलची वोडाफोन आयडियात गुंतवणूक
दिल्ली : गुगल कंपनी लवकरच टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन आयडियातील हिस्सेदारी खरेदी करणार असल्याचे समजते. दूरसंचार क्षेत्रात धडपडणाऱया व्होडाफोनला काहीसा दिलासा मिळणार आहे. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांकडून अधिकृतपणे घोषणा व्हायची आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुगल व्होडाफोनमधील अंदाजे 5 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. लवकरच याबाबत घोषणा अपेक्षीत आहे.
अरबिंदो फार्माची आंध्रात पुन्हा मोठी गुंतवणूक
हैदराबाद : आंध्र प्रदेशात आगामी काळात अरबिंदो फार्मा कंपनी 1500 ते 2 हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अरबिंदो फार्मा मंडळाचे संचालक मदनमोहन रेड्डी यांनी नुकतीच ही माहिती दिली. औद्योगिक विकासविषयक बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. अरबिंदोने यापूर्वी राज्यात 3 हजार कोटी रुपये गुंतवणूक करून सुमारे 10 हजार जणांना रोजगार उपलब्ध करून दिला होता.
सुझुकीची नवी गिक्सर 250 बाजारात
नवी दिल्ली : जपानची दुचाकी वाहन निर्मिती कंपनी सुझुकीने आपली नवी बीएस 6 शेणीतील गिक्सर 250 दुचाकी बाजारात दाखल केली आहे. या गाडीची किंमत 1.63 लाख रुपये असणार आहे तर यातील गिक्सर एसएफ 250 ही गाडी 1.74 लाख रुपये किंमतीला ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. ऑइलिंग कुलिंग सिस्टीम तंत्रज्ञाचा अवलंब या गाडीत असल्याने चालवायला गाडी खूपच आरामदायी आहे.