पिंपरी / प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी-कर्मचाऱयांना धन्वंतरी योजनाच योग्य आहे. त्यामुळे कर्मचारी महासंघाला अगोदर विमा योजनेची सविस्तर माहिती द्यावी, सर्व कर्मचारी व अधिकाऱयांना विश्वासात घेतल्याशिवाय विमा योजना लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले आहे.
त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका अधिकारी-कर्मचाऱयांच्या आरोग्यासाठी धन्वंतरी स्वास्थ योजना कार्यान्वित आहे. ही योजना बंद करुन वैद्यकीय विभागाने विमा योजना सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. सध्या सुरु असलेल्या धन्वंतरी योजनेतील त्रूटी दूर करुन नव्याने सुधारित धन्वंतरी योजना चालू ठेवणे, महापालिकेच्या आर्थिक व कर्मचाऱयाच्या सोयीसाठी आवश्यक आहे. दरम्यान, कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱयांसोबत 13 जानेवारी 2020 रोजी झालेल्या चर्चेत आपण नव्याने कार्यान्वित होणाऱया विमा योजनेबाबत कर्मचारी व अधिकाऱयांना सविस्तर माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे कर्मचारी महासंघाला विश्वासात घेतल्याशिवाय कर्मचाऱयांना विमा योजना लागू करु नये, अशी मागणी चिंचवडे यांनी केली आहे.