2 भारतीय जोडय़ांनी आमनेसामने भिडण्याची विम्बल्डनमधील पहिलीच वेळ
लंडन / वृत्तसंस्था
विम्बल्डन स्पर्धेत शुक्रवारी ‘ऑल इंडियन डबल्स’ रंगली आणि या लढतीची टेनिस वर्तुळात अगदी सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. रोहन बोपण्णा-सानिया मिर्झा विरुद्ध रामकुमार रामनाथन असे 4 भारतीय खेळाडू यावेळी कोर्टवर आमनेसामने उभे ठाकले. अनुभवी बोपण्णा व सानिया मिर्झा या जोडीने हा ऐतिहासिक सामना 6-2, 7-6 (5) अशा फरकाने जिंकला.
या लढतीच्या माध्यमातून रामकुमार रामनाथनचे ग्रँडस्लॅम पदार्पणाचे स्वप्नही साकार झाले. रामनाथनने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष एकेरी मुख्य ड्रॉमध्ये स्थान लाभावे, यासाठी आतापर्यंत थोडेथोडके नव्हे तर 21 वेळा प्रयत्न केले. प्रत्येक वेळी त्याची निराशा झाली. यंदा मात्र या विम्बल्डन मिक्स डबल्स लढतीच्या माध्यमातून त्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले.
या लढतीत रोहन बोपण्णा व सानिया यांनी पहिला सेट 6-2 अशा फरकाने सहज खिशात टाकला. त्या तुलनेत दुसऱया लढतीत मात्र रामकुमार व अंकिता यांनी संघर्षमय खेळ साकारत सामन्यात जान भरण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पॉवरफुल सर्व्ह व सॉलिड ग्राऊंड स्ट्रोक्सच्या बळावर बोपण्णा या कोर्टवरील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याचा बेसलाईनवरील खेळ निव्वळ वाखाणण्याजोगा होता.
या स्पर्धेत सानिया मिर्झाने महिला दुहेरीत देखील बेथॅनी मॅटेक-सॅण्डस्च्या साथीने आगेकूच केली आहे. रैना व तिची अमेरिकन सहकारी लॉरेन डेव्हिस यांना मात्र असिया व जेसिका पेग्युला या अमेरिकन जोडीविरुद्ध सरळ सेटस्मध्ये पराभवाचा धक्का सोसावा लागला. रैना-डेव्हिसचे आव्हान 70 मिनिटात 3-6, 2-6 अशा फरकाने संपुष्टात आले. बोपण्णा-दिविज यांचे पुरुष दुहेरीतील आव्हानही पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे.
महिला एकेरीत केर्बर चौथ्या फेरीत
या स्पर्धेतील महिला एकेरीत जर्मनीची माजी चॅम्पियन अँजेलिक्यू केर्बर हिने चौथ्या फेरीत प्रवेश करताना सॅस्नोव्हिचचा 2-6, 6-0, 6-1 असा पराभव केला. या लढतीत केर्बर पहिल्या सेट गमावल्याने पिछाडीवर होती. मात्र, नंतर सलग दोन्ही सेटस एकतर्फी फरकाने जिंकत तिने जोरदार कमबॅक नोंदवले. पुरुष एकेरीत हर्काझने अलेक्झांडर बबलिकचा 6-3, 6-4, 6-2 असा 87 मिनिटात पराभव केला. पुढील फेरीत त्याची लढत रशियन द्वितीय मानांकित मेदव्हेदेव्ह किंवा विम्बल्डन 2017 फायनलिस्ट मारिन सिलिकविरुद्ध होईल.
अँडी मरेचे आव्हान संपुष्टात
इंग्लंडचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरेचे या स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी उशिरा खेळवल्या गेलेल्या लढतीत संपुष्टात आले. मरेला 10 व्या मानांकित अँडी शॅपोवालोव्हने 6-4, 6-2, 6-2 अशा फरकाने पराभवाचा धक्का दिला. यापूर्वी, पहिल्या दोन लढतीत देखील मरेला अनुक्रमे चौथ्या व पाचव्या सेटपर्यंत झुंजावे लागले होते. अखेर येथील पराभवामुळे तो स्पर्धेतून बाहेर फेकला गेला. आणखी एका लढतीत सर्बियाच्या जोकोव्हिचने अमेरिकन क्वॉलिफायर डेनिस कुडलाचे आव्हान 6-4, 6-3, 7-6 (7) अशा फरकाने संपुष्टात आणले.