प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहरात कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी जनपरिवर्तन सामाजिक विकास संस्थेच्यावतीने सदरबाजार येथील तक्षशिला शाळेत विलगीकरण कक्ष सुरु करण्यासाठी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्याकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, बापट यांच्याकडून आजपर्यंत परवानगी दिली गेली नाही. तात्काळ ही परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जनपरिवर्तन युवा सामाजिक संघटनेचे सागर भिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
भिसे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा शहरातील तक्षशिला या पालिकेच्या शाळा क्रमांक 20 मध्ये शाळेच्या आवारात अनाधिकृतपणे कार सर्व्हिसिंग सेटर सुरु आहे. याची चौकशी करण्यात यावी, कोरोनाच्या काळात हे कोणाच्या आर्शिवादाने सुरु आहे. लोकांच्या भल्याकरता काही सामाजिक संघटना विलगीकरण कक्ष सुरु करत आहोत. तरी पालिकेचे अधिकारी का अडथळा निर्माण करत आहेत हे समजू शकत नाही. शहरात अनेक झोपडपट्ट्या आहेत. तेथे अनेक लोक राहतात. जर त्यांच्यामध्ये एक रुग्ण पॉझिटीव्ह झाला तर त्यास कोव्हिड विलगीकरणाची सोय नसल्यामुळे संपूर्ण घर पॉझिटीव्ह होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. पालिकेने नाहरकत दाखला दिला असताना अधिकारी कोविड विलगीकरण कक्ष होऊ देत नाहीत. हे कोणाच्या तरी दबावाखाली काम करतात. याची चौकशी व्हावी. शहरातील शाळा क्रमांक 20 मध्ये जनपरिवर्तन सामाजिक विकास संस्थेच्या वतीने कोविड विलगीकरण कक्ष तयारी केली असता यामध्ये खाटा, सॅनिटायझर, गाद्या, मास्क याची पूर्ण व्यवस्था केली असली तरीही अधिकारी तेथे विलगीकरण कक्षास परवानगी देत नाहीत.