बेळगाव / प्रतिनिधी
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनतर्फे शुक्रवारपासून दोन दिवसीय देशव्यापी बंदची हाक देण्यात आली होती. यामध्ये बेळगाव जिल्हय़ातील सर्व राष्ट्रीयकृत बँका बंद ठेवून शुक्रवारी कर्मचारी सहभागी झाले. सकाळी धर्मवीर संभाजी चौक येथून बँक कर्मचाऱयांनी आपल्या विविध मागण्यांकरीता भव्य अशी रॅली काढली. सरकारने मागण्या मान्य न केल्यास यापुढे देखील संप पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
20 टक्के पगार वाढ करावी, 5 दिवसांचा आठवडा बॅंकिंग आठवडा करावा, पगाराबरोबरच इतर भत्ते द्यावेत, नवीन पेन्शन स्कीम बंद करावी, पेन्शनमध्ये सुधारणा करावी यासह इतर 12 प्रमुख मागण्या या कर्मचाऱयांनी सरकारकडे केल्या आहेत. शनिवार दि. 1 फेब्रुवारीलाही हा संप असणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
धर्मवीर संभाजी चौकातून सुरू झालेली ही रॅली किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, खडे बाजार, गणपत गल्ली, मारूती गल्ली येथील सिंडीकेट बँक येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी कर्मचाऱयांनी घोषणा देवून आपल्या मागण्या मांडल्या. यानंतर संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱयांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये जिल्हय़ातील शेकडो राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी सहभागी झाले होते.