प्रतिनिधी/ नाशिक,
नाशिकजवळील मालेगाव-देवळा रस्त्यावरील मेशी फाटा येथे मंगळवारी दुपारी एसटी बस आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. सदरच्या अपघातानंतर बस आणि रिक्षा शेजारी असलेल्या शेतातील विहिरीत जाऊन कोसळली. हा अपघात बस आणि रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटल्याने घडला. यामध्ये 21 जणांचा मफत्यू झाला असून
31 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
मेशी फाटय़ाजवळ असलेल्या देशविदेश हॉटेलजवळ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसचे (एम एच 06 एस 8428) उमराणा-देवळा रस्त्यावर टायर फुटले. यावेळी येस गावातील ऍपे रिक्षाला बसने धडक दिली. यामध्ये रिक्षा आणि बस जवळच असलेल्या विहिरीचा कठडा तोडून सुमारे 60 फूट खोल विहिरीत जाऊन कोसळली. यामुळे रिक्षामधील सात ते आठ प्रवासी विहिरीत अडकले. तर 31 हून अधिक लोक जखमी झाले. या दुर्घटनेतील काहींना बाहेर काढण्यात यश आले तरी अनेक प्रवासी विहिरीत आहेत. त्यामुळे मफतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. जखमींना उमराणे, देवळा व मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. याशिवाय नाशिकच्या जिल्हा रुग्णालयानेही सज्जता ठेवली. जिल्हा शल्यचिकित्सकांसह जिल्हा रुग्णालयाची पाच वाहने घटनास्थळी मदत कार्यासाठी दाखल झाली.
असे झाले मदतकार्य
या घटनेची माहिती सर्वत्र पसरल्यानंतर स्थानिकांच्या साहाय्याने मदतकार्य हाती घेण्यात आले. यामध्ये जवळपास 15-20 बसमधील प्रवाशांना दोरखंडाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि पोलीस यंत्रणा दाखल झाली. त्यानंतर क्रेन आल्यानंतर अथक प्रयत्नानंतर बस बाहेर काढण्यात आली.
तसेच या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चांदवड-देवळय़ाचे आमदार डॉ. राहुल आहेर घटनास्थळी दाखल झाले.
या अपघातात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसचे चालक पी.एस. बच्छाव हे जागीच ठार झाले असून, वाहक कमल लक्ष्मण राऊत हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांमध्ये एकूण सात लहान मुलांचा समावेश आहे. घटनास्थळी काही जणांचे मृतदेह हाती लागले असून, अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत.