लॉकडाऊन काळात बंद ‘मीटर रिडिंग’ घेण्यास पूर्ववत सुरुवात : प्रतिबंधित क्षेत्र वगळून रिडिंग
वार्ताहर / कणकवली:
लॉकडाऊन काळात वीज मीटर रिडिंग घेणे बंद करण्यात आले होते. मात्र, महावितरणच्या ऍपद्वारे ऑनलाईन मीटर रिडिंग ग्राहकांना देण्याची सवलत होती. मात्र, आता प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग घेण्यास महावितरणकडून सुरुवात करण्यात आली आहे. त्या रिडिंगनुसार आता गेल्या दोन-अडिच महिन्यांच्या वीज वापरानुसार एकत्रित वीजबिल देण्यात येणार आहे. वीजबिलाचे प्रतिमाह विभाजन करून वीज वापराप्रमाणे मिळणारी सवलतही (स्लॅब बेनिफिट) देण्यात आली आहे. ग्राहकांनी वीज बिलाची रक्कम भरणा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणमार्फत करण्यात आले आहे.
कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात लॉकडाऊन घोषित करण्यात आले. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात मीटर रिडिंग घेणे शक्मय झाले नव्हते. जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील वीज वापराच्या सरासरी युनिटप्रमाणे या दोन्ही महिन्यांचे वीजबिल आकारण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊन व वाढत्या तापमानामुळे प्रत्यक्षात विजेचा वापर अधिक होता. मात्र, कमी वीज वापर असणाऱया महिन्यातील सरासरीप्रमाणे वीजबिल आकारण्यात आले. आता प्रतिबंधित भाग वगळता इतर ठिकाणी मीटर रिडिंग घेऊन प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे गेल्या दोन-अडीच महिन्यांचे एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे.
वीजबिल अधिक असण्याच्या तक्रारी
यानुसार देण्यात येत असलेले वीजबिल अधिक असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एकत्रित दिलेल्या बिलाचे विभाजन करून ग्राहकांना स्लॅब बेनिफिट देण्यात आले आहे. मीटर रिडिंग व वीजबिल यात तफावत असणारी बिले दुरुस्त करून देण्यात येणार आहेत. लॉकडाऊन कालावधीत ग्राहकांनी भरणा केलेल्या रकमेची वीजबिलातून कपात करण्यात आल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
बिलाची मासिक वापरानुसार विभागणी
लॉकडाऊनच्या कालावधीत मीटर रिडिंग घेणे तात्पुरते बंद असल्याने ग्राहकांना सरासरी युनिटचे वीजबिल पाठविण्यात आले होते. वेबपोर्टल व मोबाईल ऍपद्वारे स्वतःहून मीटर रिडिंग पाठविणाऱया ग्राहकांना प्रत्यक्ष वीज वापरानुसार बिले देण्यात आली आहेत. मात्र, एप्रिल, मे, जून महिन्यात स्वतःहून रिडिंग न पाठविणाऱया वीज ग्राहकांना आता मीटर रिडिंग घेतल्यानंतर अचूक व प्रत्यक्ष वीज वापरानुसार बिल पाठविण्यात येत आहे. हे वीजबिल लॉकडाऊन कालावधीतील दोन-अडीच महिन्यांचे असले, तरी संगणकीय प्रणालीद्वारे बिलाची मासिक वापरानुसार विभागणी करून युनिट व वापराप्रमाणे वीजदर लावून (स्लॅब बेनिफिट) देण्यात येत आहे.
…तर उर्वरित रकमेचे समायोजन करणार
उदाहरणार्थ दोन महिन्यांचे वीजबिल 330 युनिट असल्यास 330 युनिटचा स्लॅब दर न लावता, मासिक प्रत्येकी 165 युनिटप्रमाणे स्लॅब दर लावण्यात येत आहेत. एप्रिल व मे महिन्यातील सरासरी युनिटचे व बिलाची रक्कम भरली असल्यास स्थिर आकार, विद्युत शुल्क वगळून उर्वरित रकमेचे समायोजन करण्यात येत आहे. यासंबंधीची माहिती ग्राहकांसाठी संबंधीत वीज बिलामध्ये ठळकपणे नमूद करण्यात येत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.