प्रतिनिधी/ मडगाव
घरातच वीजेचा धक्का लागून चिंचाळवाडा-मडगाव येथील युवा स्थापत्य अभियंता विप्रेष कळंगूटकर (26) यांचे रविवार दि. 1 रोजी नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 वा. दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने त्याच्या मित्र परिवाराला जबरदस्त धक्का बसला. वीजेचा धक्का बसल्यानंतर विप्रेषला मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात आणले गेले. त्यावेळी त्यांच्या मित्र परिवाराने हॉस्पिसियो इस्पितळात मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती.
विप्रेषच्या पश्च्यात आई, भाऊ व बहिण असा परिवार आहे. विप्रेष राहि कन्स्ट्रक्शनमध्ये स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत होता. तत्पूर्वी फोंडा येथील राज हाऊसिंग डिवेलप्मन्ट प्रा. लि. मध्ये ही त्याने स्थापत्य अभियंता म्हणून काम केले होते.
युवा अभियंत्याला अपघाती मृत्यू आल्याने विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी तीव्र दुखवटा व्यक्त केला आहे. ही दुर्दैवी घटना असून आपण विप्रेषच्या कुटूंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.