गावागावांत नरकासूर प्रतिमांची उभारणी
प्रतिनिधी/ पणजी
केवळ 9 दिवसांवर येऊन ठेपलेल्या दीपावली उत्सवाची तयारी राज्यात जोरदारपणे चालू आहे. यंदा ऐन दिवाळीत गावठी पोह्यांचे दर 120 रु. प्रति किलो होण्याची शक्यता आहे. महागाईने कहर केलेला असला तरी देखील कोरोनाची पर्वा न करता नव्या जोमाने नागरिक उत्सवाची तयारी करु लागले. त्याचबरोबर गोव्यातील दिवाळीचे खास आकर्षण असलेल्या नरकासूर प्रतिमा गावागावांत उभ्या राहू लागलेल्या आहेत.
दिव्यांचा व उत्साहाचा उत्सव म्हणून ज्याकडे पाहिले जाते त्या दिवाळी उत्सवाची तयारी राज्यात सध्या उत्साहात चालू आहे. दि. 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी राज्यात दिवाळी उत्सवाला प्रारंभ होईल. दि. 14 रोजी पहाटे नरकासूर प्रतिमेचे दहन करुन दिवाळी उत्सवाला प्रारंभ होइल. दि. 13 रोजी धनत्रयोदशी तर दि. 14 रोजी पहाटे दिवाळीला प्रारंभ होईल व सायंकाळी लक्ष्मीपूजन होईल तर या उत्सवातील खास आकर्षण असलेला भाउबीज उत्सव दि. 16 रोजी होईल. त्याचदिवशी पाडवा असल्याने शुभ दिवस आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने नव्या आस्थापनांच्या उद्घाटनाची तयारी देखील चालू आहे.
कोरोनाला बाजूला सारुन दिवाळीची उत्साहात तयारी
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे हैराण झालेल्या तसेच अनेकजण बेकारीमुळे त्रस्त झालेल्यांचा संसार हळूहळू पुन्हा स्थिरस्थावर होत आहे. कोरोनाचा प्रभाव पावसाबरोबर ओसरत गेलेला आहे आणि राज्यातील जनतेला आता दिवाळीचे वेध लागलेले आहे. पुढील आठवडय़ात दिवाळी उत्सव साजरा होणार आहे. दरवर्षी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात उत्सव होणार नसला तरी जनतेमध्ये मात्र उत्साह संचारण्यास प्रारंभ झालेला आहे. बाजारात विविध प्रकारचे रंगीबेरंगी आकाशकंदील विक्रीस आलेले आहेत. दिवाळी उत्सवानिमित्त विविध प्रकारच्या पणत्या, दिवे तसेच आवश्यक वस्तू विक्रीस उपलब्ध झालेल्या आहेत. लक्ष्मीपूजनासाठी रंगीबेरंगी व आकर्षक हार देखील दुकानांत विक्रीस उपलब्ध झाले आहेत.
नरकासूर प्रतिमा बनविण्यास प्रारंभ
गोव्यातील दिवाळी उत्सवाचे खास आकर्षण असलेल्या नरकासूर प्रतिमा बनविण्यास प्रारंभ झालेला आहे. यंदा कुठेही नरकासूर प्रतिमा स्पर्धा होणार नाहीत मात्र चौकाचौकात गावागावांत, वाडय़ांवर नरकासूर प्रतिमा बनवून रात्रभर जागरण करुन दिवाळी दिवशी पहाटे त्याचे दहन करण्याच्या प्रथेत यावर्षी देखील बदल होणार नाही. सध्या अनेक मुले व तरुण मंडळी रात्री उशिरापर्यंत काम करुन नरकासूर प्रतिमा बनविण्याचे काम उत्साहात करीत आहे.
पोहे महागणार!
काही व्यापाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी गावठी पोह्यांचे दर प्रतिकिलो 120 रु. होणार आहे. गेल्यावर्षी ऐन दिवाळीत गावठी पोह्यांचे दर प्रतिकिलो 100 होता. नेहमीचे पोहे सध्या प्रतिकिलो 60 रु. तर गावठी पोहे रु. 70 ते 80 या दराने विकले जातात. दिवाळीला पोहे खाण्याची प्रथा व परंपरा गेली अनेक वर्षे चालत आहे. पोह्यांचे विविध प्रकार करुन शेजारी पाजारी तसेच नातेवाईकांनाही देऊन आपला आनंद द्विगुणीत केला जातो.
आकाशकंदील कलाकार नाराज, स्पर्धा रद्द!
दरम्यान, दिवाळीचे खास आकर्षण असलेले रंगीबेरंगी आकाशकंदीलसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या स्पर्धा आयोजकांनी यंदा रद्द केल्याने कलाकारांमध्ये नाराजी पसरली आहे. दरवर्षी लाखो रुपयांची बक्षिसे देऊन भव्यदिव्य आकाशकंदील स्पर्धा आयोजित करणारे मंत्री मायकल लोबो यांनी देखील कोरोनामुळे नरकासूर स्पर्धा व आकाशकंदील स्पर्धा रद्द करीत असल्याचे जाहीर पेले. विविध संघटनांतर्फे यावर्षी आकाशकंदील स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
बाजारात लगबग सुरु
पुढील आठवडय़ात होणार असलेल्या दिवाळीनिमित्त बाजारपेठा सजू लागलेल्या आहेत. त्याचबरोबर नागरिकांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. सुका मेवा विक्रेत्यांनी यावर्षी देखील सुका मेवा विक्रीस आणलेला आहे व ग्राहकांची वाट पाहत आहेत.