प्रतिनिधी / मडगाव
आकें-बायश पंचायत क्षेत्रात बोरकर सुपर स्टोअरच्या समोर कचऱयाला लावलेली आग भडकली अन् या आगीत येथील वीज ट्रान्सफॉर्मरला धोका निर्माण झाला होता. आग वीज ट्रान्सफॉर्मरच्या जवळ पोचल्याचे लक्षात येताच येथील एक जागृत नागरिक लक्ष्मण परब यांनी त्वरित आग विझविण्यास पुढाकार घेतल्याने वीज खात्याचा ट्रान्सफॉर्मर आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचविण्यात यश मिळविले. ही घटना सोमवारी घडली.
आगी जर ट्रान्सफॉर्मर पर्यंत पोचली असती तर ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला असता व वीज खात्याला लाखो रूपयांचा फटका बसला असता. लक्ष्मण परब यांनी आग वीज ट्रान्सफॉर्मरजवळ पोचल्याचे पाहून स्थानिकांच्या मदतीने पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळविले व आग वीज ट्रान्सफॉर्मर पर्यंत पोचणार नाही याची दक्षता घेतली. तसेच अग्नी शामक दलाला आगीची कल्पना दिली. अग्नीशामक दलाचे पथक त्वरित घटनास्थळी पोचले व त्यांनी पूर्ण आगीवर नियंत्रण मिळविले.
ही आग नेमकी कशामुळे लागली हे जरी स्पष्ट होत नसले तरी पंचायतीच्या कामगारांनी टाकलेल्या कचऱयाला ही आग लावल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कचऱयाची विल्हेवाट लावण्यासंदर्भात सुद्धा कामगारांना मार्गदर्शन करायला पाहिजे तसेच वीज खात्याने आपल्या ट्रान्सफॉर्मरची जागा स्वच्छ ठेवणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रीया स्थानिक नागरिकांनी तसेच लक्ष्मण परब यांनी ही व्यक्त केली आहे. लक्ष्मण परब यांनी यापूर्वी जुवारी पुलावर अवजड वाहनाना बंदी घातली असताना देखील एक मालवाहू ट्रक नेण्याचा प्रयत्न चालकाने केला असता, त्यांनी तो ट्रक रोखून धरला तसेच ट्रक पुलावरून जाण्यास मोकळीक न देता, ट्रक माघारी पाठविला होता. जुवारी पुलावर रात्रीच्यावेळी व भल्या पहाटे पोलिसांच्या आशीर्वादाने अवजड वाहनाची वाहतूक होत असल्याचा आरोप होत आहे.