धारवाड येथे नोंदविले आक्षेप : हेस्कॉमचा तोटा 974 कोटींवर : केईआरसीकडून बैठकीचे आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही 1 एप्रिलपासून राज्यात नवीन वीज दर लागू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु या दरवाढीला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. कोरोनानंतर परिस्थिती हलाखीची असताना राज्यात वीज दरवाढ करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला. धारवाड येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत नागरिकांनी आक्षेप घेत दरवाढ करू नये, अशी भूमिका घेतली.
कर्नाटक इलेक्ट्रीसिटी रेग्युलेटरी कमिशन (केईआरसी) ने सोमवारी आक्षेप बैठकीचे आयोजन केले होते. धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या बैठकीला हेस्कॉमचे व्यवस्थापकीय संचालक एम. मुनीराजू उपस्थित होते. यावेळी 26 हून अधिक आक्षेप नोंदविण्यात आले.
दरवाढीशिवाय पर्याय नाही
दरवाढीबद्दल माहिती देताना एम. मुनीराजू म्हणाले, हेस्कॉमला 974 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यामुळे दरवाढ केल्याशिवाय हेस्कॉमकडे पर्याय नाही. हेस्कॉम प्रति युनिट 5.34 रुपयांनी वीज खरेदी करत असून मागील वषी हाच दर 4.21 रुपये होता. ही तफावत भरून काढायची असेल तर दरवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
220 लाख युनिट वीज बचत
हेस्कॉमने आतापर्यंत दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती, इन्टिग्रेटेड
पॉवर डेव्हलपमेंट स्कीम यासह नवीन ट्रान्स्फॉर्मर व अत्याधुनिक केबल घातले आहेत. हेस्कॉम 24 तास तीन प्रकारांमध्ये वीजपुरवठा करत आहे. यासोबत निरंतर ज्योती स्कीममधून गावागावात वीजपुरवठा करण्यात येत आहे. 24.27 लाख एलईडी बल्बची विक्री करण्यात आली असून यातून 220 लाखांहून अधिक युनिट वीज वाचविण्यात आली आहे. 31 हजार 745 टय़ुबलाईटची विक्री करण्यात आली असून त्यातून 2 लाख युनिट वीज वाचविण्यात आली आहे.
प्रतियुनिट 73 पैसे वाढीचा प्रस्ताव
हेस्कॉमला होणारा तोटा भरून काढण्यासाठी यावषी दरवाढ होणे गरजेचे आहे. त्यामुळे हेस्कॉमने केईआरसीसमोर प्रतियुनिट 73 पैसे दरवाढ करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावामुळे सर्वच ग्राहकांना आता वीज दरवाढीचा भडका सहन करावा लागणार आहे. या बैठकीला बेळगाव, धारवाड, उत्तर कन्नड, गदग व हावेरी या जिल्हय़ांमधील व्यापारी, उद्योजक व नागरिक उपस्थित होते.