दुष्परिणामांबद्दल निर्माण झालेला गैरसमज दूर केल्यानंतर कामगारांचा प्रतिसाद : उर्वरित कामगारांना टप्प्याटप्प्याने लस देण्यात येणार
प्रतिनिधी / बेळगाव
दुसऱया टप्प्यात महापालिकेच्या स्वच्छता कामगारांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, लस घेण्यास कामगारांनी प्रतिसाद दिला नाही. याबाबत कर्मचाऱयांची मनधरणी करून गैरसमज दूर करण्यात आला असून, आतापर्यंत 522 स्वच्छता कामगारांनी लस घेतली आहे. उर्वरित कामगारांना लस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील वैद्यकीय अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. दुसऱया टप्प्यात महापालिका स्वच्छता कामगारांसह कार्यालयीन कर्मचाऱयांना लस देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र, लस घेतल्यानंतर ताप येतो, अशक्तपणा येतो अशा विविध तक्रारी सांगण्यात आल्याने स्वच्छता कामगारांनी लस घेण्याकडे पाठ फिरविली होती.
लसबाबत स्वच्छता कामगारांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याने लस घेण्यास टाळाटाळ चालविली होती. मात्र, काही स्वच्छता कामगारांनी लस घेतली होती, त्यांना कोणताच त्रास जाणवला नाही.
यादी आरोग्य खात्याला
महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱयांनी स्वच्छता कामगारांचा गैरसमज दूर करून लस घेण्याचे आवाहन केले. त्यांची मनधरणी करून लस घेतल्याने कोणतेच दुष्परिणाम होत नसल्याचे पटवून दिल्यानंतर लस घेण्याची तयारी स्वच्छता कामगारांनी दर्शविली आहे. त्यामुळे 1100 पैकी आतापर्यंत 522 स्वच्छता कामगारांनी लस घेतली आहे. उर्वरित कामगारांना टप्प्याटप्प्याने लस देण्यात येणार आहे. कार्यालयीन कामगारांची व अधिकाऱयांची यादी आरोग्य खात्याला देण्यात आली असून, त्यांनादेखील लस देण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.