सर्वसाधारण चारशे पटीने वाढ
प्रतिनिधी / पणजी
वीज खात्याने सोमवार दि. 10 मे 2021 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत वीज दरात चार पटीने वाढ केली असून या कोविडच्या काळात सामान्य जनतेच्या खिशाला भरमसाठ फटका बसणार आहे. ही दरवाढ या महिन्यापासून लागू करण्यात आली आहे.
मुख्य वीज अभियंता तथा एक्स ऑफिशिओ अतिरिक्त वीज सचिव रघुवीर केणी यांच्या सहीने सोमवारी निघालेल्या या अधिसूचनेप्रमाणे पहिल्या 100 युनिटसाठी जो दर 1 रु. 40 पैसे होता तो वाढवून 5 रु. 52 पैसे करण्यात आला आहे. व्यावसायिक आस्थापनासाठीही वीज दरात वाढ करण्यात आली असून पहिल्या 100 युनिटसाठी 13 रुपये 3 पैसे, 200 युनिटसाठी 17 रु. 57 पैसे व 400 पेक्षा अधिक युनिटसाठी 19 रु. 5 पैसे आकारले जाणार आहेत.
उद्योगांसाठी पहिल्या 500 युनिटसाठी 16 रु. 62 पैसे व त्यानंतरच्या युनिटसाठी 14 रु. 93 पैसे आकारण्यात येणार आहेत. हॉटेल उद्योगांसाठी 17 रु. 51 पैसे, होर्डिंग आणि साईन बोर्ड फलकांसाठी 40 रु. 85 पेसे तर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनसाठी 11.83 रुपये प्रति युनिट वीज बिल आकारले जाणार असल्याचे या अधिसूचनेद्वारे कळवण्यात आले आहे.