दोडामार्ग राष्ट्रवादीचा वीज अधिकाऱयांना इशारा
वार्ताहर / दोडामार्ग:
ऐन तसेच मोक्याच्या वेळी दोडामार्ग शहरातील वीजपुरवठा खंडित करून वीज मंडळाचे कर्मचारी आपली कामे करतात. त्यामुळे त्याचा सर्व व्यापारी, नागरिकांना त्रास होत आहे. यावर योग्य तोडगा काढावा. न पेक्षा व्यापारी, नागरिकांना घेऊन तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा दोडामार्ग शहर राष्ट्रवादीच्यावतीने गुरुवारी येथील वीज मंडळाच्या उपविभागीय कार्यालयातील सहायक अभियंता केतन पवार यांना दिला. पवार यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांनी चांगलेच धारेवर धरले. गुरुवारी दुपारी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. संदीप गवस, तालुका उपाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर तसेच व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष लवू मिरकर, सामजिक कार्यकर्ते सुचन कोरगांवकर आदींनी शहरातील वीज मंडळाच्या उपविभागीय कार्यालयात धडक दिली. गेल्या काही दिवसांपासून दोडामार्ग शहरात सकाळी 9 ते 12 वा. सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे अनेक व्यापारी, विजेवर अवलंबून असणारे व्यावसायीक आदींची मोठी अडचण होते. वीज मंडळाच्या कामगारांना याबाबत विचारले असता, शहरातील रस्त्याच्या कडेला लागून असलेली झाडे तोडण्याचे काम सुरू आहे, असे सांगितले जाते. वास्तविक पावसाळय़ापूर्वी ही कामे होणे आवश्यक होते. किंबहुना मागील एक दोन महिन्यापूर्वीच्या लॉकडाऊन काळात वीज मंडळाचे अधिकारी, कर्मचारी यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे होते. मात्र, दुर्दैवाने तसे घडले नाही. शहरातील सर्व नागरिक, व्यापारी वीज मंडळाला वेळोवेळी सहकार्य करीत आले आहेत, असे असताना देखील मात्र वीज मंडळाचे अधिकारी जाणुन-बुजून शहरातील व्यापारी व नागरिक यांना मुद्दाम त्रास होईल, असे वागत असल्याचा आरोप यावेळी उपस्थित सर्वांनी केला. यावेळी पवार यांनी व्यापारी व नागरिकांच्या तक्रारी व सूचनांकडे गांभिर्यपूर्व पाहिले जाईल व त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असे सांगितले.