भुवनेश्वर :
सातव्या इंडियन सुपरलिग फुटबॉल हंगामासाठी ओडिशा एफसी फुटबॉल क्लबने नवोदित फुटबॉलपटू बी. बोडो आणि लेसराम प्रेमजीत सिंग यांच्याशी नवा करार केला आहे.
वीस वषीय बोडो याने यापूर्वी इंडियन सुपरलिग फुटबॉल स्पर्धेत केरळ ब्लास्टर्स आणि चेन्नयीन एफसी संघांचे प्रतिनिधित्व केले होते. भारतीय युवा फुटबॉल संघातील बोडो हा महत्त्वाचा फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. आसामच्या बोडोने आतापर्यंत बेंगळूर युनायटेड, गोकुळम केरळ आणि मिनर्व्हा पंजाब संघाकडून खेळ केला आहे. आता ओडिशा एफसी संघाबरोबर बोडोने दोन वर्षाचा करार केला आहे. मणिपूरचा 18 वषीय लेसराम प्रेमजीत सिंग याने यापूर्वी आय लिग फुटबॉल स्पर्धेत मणिपूरच्या टेयु एफसी संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
भुवनेश्वरमध्ये वास्तव्य असलेल्या प्रेमजीत सिंगने ओडिशा एफसी बरोबर चार वर्षांचा करार केला आहे. सदर माहिती ओडिशा एफसी संघाचे अध्यक्ष रोशन शर्मा यांनी दिली आहे. बोडो आणि प्रेमजीत सिंग यांच्या सहभागामुळे आता इंडियन सुपरलिग स्पर्धेच्या आगामी हंगामात ओडिशा एफसी संघ अधिक बलवान राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.