बारामती व खंडाळा तालुक्यातील 9 रईसजाद्यांना अटक, खंडाळा तालुक्यात खळबळ
प्रतिनिधी/ खंडाळा
खंडाळा तालुक्यातील तोंडल याठिकाणी वीर धरण परिसरात सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या जिल्हाबंदीच्या आदेशाचा भंग करीत दारु पार्टीचे आयोजन करीत दारु पिऊन झिंगाट झालेल्या पुणे जिह्यातील बारामती व सातारा जिह्यातील खंडाळा तालुक्यातील रईसजाद्यांनी शासनाची परवान्याची मुदत संपलेल्या रिव्हॉल्व्हरद्वारे हवेत दोनवेळा फायरिंग करीत दहशत निर्माण करणाऱया नऊ जणांच्या टोळक्याला शिरवळ पोलिसांनी कायद्याचा जोरदार हिसका दाखवित अटक केली आहे. या घटनेमुळे सातारा जिह्यासह खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेप्रकरणी किरण देविदास निगडे (वय 46 रा. गुळूंचे ता. पुरंदर जि. पुणे), सूर्यकांत चंद्रकांत साळुंखे (वय 28, रा. कानिफनाथवस्ती, भादे ता. खंडाळा), नवनाथ बबन गाडे (वय 34 रा. चोपडज, पोस्ट करंजे ता. बारामती जि. पुणे), माधव अरविंद जगताप (वय 32, रा. वाकी पोस्ट करंजे ता. बारामती जि. पुणे), तात्याराम अर्जुन बनसोडे (वय 38, रा. अंथूर्णे ता. इंदापूर जि. पुणे), विजय ज्ञानदेव साळुंखे (वय 39, रा. चोपडज (सोमेश्वर) पोस्ट करंजे ता. बारामती जि. पुणे), योगेश प्रकाश रणवरे (वय 42, रा. राख ता. पुरंदर जि. पुणे), वसंत नामदेव पवार (वय 47, रा. कोळविहीरे ता. पुरंदर जि. पुणे), अरविंद घनशाम बोदेले (वय 41, सध्या रा. लवथळेश्वर, जेजूरी ता. पुरंदर जि.पुणे मूळ रा.भिवापूर जि.नागपूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.
यामध्ये किरण निगडे यांच्या मालकीची शासनाची परवान्याची मुदत संपलेली रिव्हॉल्व्हर, दोन कार, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे किरण निगडे याने स्वतः दहशत पसरविण्याच्या उद्देशाने रिव्हॉल्व्हरद्वारे हवेत गोळीबार करीत बेकायदेशीररित्या मित्र योगेश रणवरे याला रिव्हॉल्व्हर देत त्यानेही हवेत गोळीबार करीत वीर धरण परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबतची माहिती मिळताच तत्काळ शिरवळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गोळीबार करणाऱया रईसजाद्यांच्या मुसक्या आवळत पोलिसी खाक्या दाखविला.
याप्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मदन वरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किरण निगडे याच्यासह नऊ जणांविरुध्द शिरवळ पोलीस स्टेशनला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, भारतीय शस्त्र अधिनियमांसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सातारा जिह्यासह पुणे जिह्यात खळबळ उडाली आहे.
या घटनेचा अधिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे हे करीत आहे.