ब्रिटिश पत्रकाराचा दावा- लॅबमध्ये हजार प्राण्यांचे बदलण्यात आले जीन
वृत्तसंस्था/ लंडन
कोरोनाच्या उत्पत्तिवरून जगाच्या निशाण्यावर आलेल्या चीनच्या वुहान शहरासंबंधी आणखी एक दावा करण्यात येत आहे. वुहानच्या लॅबमध्ये जेनेटिक इंजिनियरिंगच्या मदतीने 1 हजारांहून अधिक प्राण्यांचे जीन बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या प्राण्यांमध्ये माकड आणि सशाचाही समावेश आहे. वुहानमधूनच जगभरात कोरोना विषाणू फैलावला होता. चीनमध्ये दीर्घकाळ राहिलेले ब्रिटिश पत्रकार जॅस्पर बेकर यांनी हा दावा केला आहे.
चीनच्या प्रयोगशाळेत प्राण्यांना विषाणूचे इंजेक्शन देण्यात ते त्यांचे जीन बदलण्याचा प्रयोग करण्यात आला. इंजेक्शनमध्ये वापरण्यात आलेल्या सामग्रीमुळे कोरोना विषाणूची उत्पत्ति झाल्याचे मानले जात आहे. अन्य देशांमध्ये बंदी असलेले प्रयोगही चीन स्वतःच्या प्रयोगशाळांमध्ये करत आहे. माणसांवरही तेथे प्रयोग सुरू आहेत. तर अनेक देशांमध्ये अशाप्रकारचे प्रयोग अनैतिक मानले जातात.
वुहान किंवा अन्य ठिकाणी प्रयोगशाळा जैवसुरक्षेवरील संशोधनासाठी तयार करण्यात आल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न चीन करतो, पण तेथे जिवंत प्राण्यांवर प्रयोग केले जात आहेत. प्रयोगावेळी प्राण्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेतली जात नाही. टेस्ट टय़ूबमध्ये ठेवण्यात आलेल्या जिवाणूंना पाहून माकड पळण्यासह चावा घेऊ लागत असल्याचे दिसून आले आहे.
605 वटवाघळांचाही समावेश
वुहान सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने स्वतःच्या लॅबमध्ये आजारी प्राणी ठेवले आहेत. यात सुमारे 605 वटवाघळं आहेत. ही वटवाघळं संशोधकांवर हल्लाही करत असतात. वुहानमधील वायरोलॉजिस्ट शी झेंगली यांनी दुर्गम गुहांचा दौरा केला होता. तेथे वटवाघळांवर त्या संशोधन करत होत्या. चीनमध्ये झेंगली यांना ‘बॅट वुमन’ नावाने ओळखले जाते. झेंगली यांनीच लॅबमध्ये कोरोना विषाणू तयार केल्याची शक्यता आहे. झेंगली यांनी अनेक उंदरांना विषाणूचे इंजेक्शन टोचले होते.