वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
हलगा (ता. बेळगाव) गावची सुकन्या व नामवंत होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिला भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट ऍथलिटसाठी इन्स्टिटय़ूशनल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. दि. 17 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे हा सोहळा पार पडला. गेल्या चार वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये मिळविलेल्या सातत्यपूर्ण अत्त्युत्तम कामगिरीबद्दल तिचा हा गौरव करण्यात आला.
गेली चार वर्षे क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी बजावणारे साई स्पोर्ट्स बेंगळूरचे क्रीडापटू आणि प्रशिक्षक अशा संपूर्ण देशातील निवडक 11 जणांचा भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे 17 नोव्हेंबर रोजी प्रशस्तीपत्रकसह रोख रकमेचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सत्कारमूर्तींमध्ये बसवाण गल्ली, हलगा येथील होतकरू युवा महिला वेटलिफ्टर अक्षता कामती हिचाही समावेश होता.
जवाहरलाल नेहरू स्टेडियम, नवी दिल्ली येथे झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळय़ात अक्षता कामती हिला भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि केंद्रीय क्रीडा खात्याचे मंत्री अनुराग ठाकुर यांच्या हस्ते इन्स्टिटय़ूशनल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
अक्षता 2017 सालापासून राष्ट्रीय स्तरावर वेटलिफ्टींगमध्ये चमकदार कामगिरी नोंदवत आहे. तिने प्रामुख्याने गेल्या चार वर्षात महिलांच्या कनि÷ राष्ट्रीय वेटलिफ्मटींग स्पर्धेत 3 सुवर्ण पदके, खेलो इंडियामध्ये 2 सुवर्णपदके, आणि महिलांच्या वरिष्ट राष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत कांस्यपदक हस्तगत केले आहे.
मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अक्षता हिच्या उत्कृष्ट कामगिरीची प्रशंसा केली आहे. याखेरीज अन्य स्पर्धांमध्येही तिने भरीव कामगिरी नोंदविली आहे.
अक्षता ही सध्या 81 किलो वजनी गटात खेळत असून वेटलिफ्टींगच्या ‘स्नॅच ऍण्ड क्लीन जर्क’ या प्रकारात तिचा चांगला हातखंडा आहे. तिचे दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण हलगा येथील शारदा गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले असून हरयाणा येथे पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केल्यांनतर सध्या ती पंजाब येथील लव्हली युनिर्व्हसिटीमध्ये बी. ए. करत आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.
अक्षता ही साई स्पोर्ट्स इंडिया बेंगळूर येथे गेली पाच वर्षांपासून सराव करत असून अक्षताला शामला शेट्टी, वीरपाल, मिनाक्षी श्यामसुंदर, बेळगाव जिल्हय़ाचे कोचर सदानंद मालशेट्टीसह हलगा ग्रामस्थाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळत आहे.
अक्षता ही हलगा गावचे प्रतिष्ठित नागरिक बसवंत कामती व सुधा कामती यांची कन्या आहे. तसेच सांबरा गावचे नारायण अप्पय्याचे व महेश अप्पय्याचे यांची भाची आहे.