10 हजार रुपये देऊन कोरोना बाधितासोबत डिनर
कोरोना विषाणूच्या कहरामुळे जग त्रस्त झाले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढतेय. अशा स्थितीत अधिकाधिका लोकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जातोय. परंतु काही लोक लस टोचून न घेण्यासाठी ‘जीवघेणी युक्ती’ लढवत आहेत. असे लोक स्वतःहून कोरोनाबाधित होऊन घेत आहेत.
इटलीत लसविरोधक लसीकरणापासून वाचण्यासाठी अजब क्लृप्त्या लढवत आहेत. इटलीत 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी (50 वर्षांवरील) लसीकरण अनिवार्य होणार आहे. लस न घेणाऱया लोकांवर सरकार कारवाई करत दंड ठोठावणार आहे. अशा लोकांना नोकरी देखील गमवावी लागू शकते. तरीही काही लोक स्वतःचा हट्ट सोडण्यास तयार नाहीत.
संक्रमित होण्यासाठी पैसे खर्च
इटालियन ऍटी व्हॅक्सर्स कोरोनाबाधित लोकांसोबत डिनर आणि वाइन पार्टी करत आहेत, जेणेकरून स्वतःला देखील संक्रमित करता येऊ शकेल. याकरता असे लोक 10 हजार रुपयांहून अधिक रक्कम खर्च करत आहेत. लसविरोधी लोक कोविड पाटर्य़ांमध्ये सामील हो आहेत. स्वतः पैसे खर्च करून संक्रमितांसोबत पार्टी करत आहेत. बाधित लोकांचे काही काळापर्यंत लसीकरण न करण्याचे धोरण इटलीत आहे.
अलिकडेच टस्कनी येथील एका कोविड पार्टीचा खुलासा झाला आहे. जेथे एका कोरोनाबाधितासोबत लोक डिनर आणि वाइनचा आनंद घेत होते. या पार्टीत सामील हाण्यासाठी 110 युरोंचे शुल्क ठेवण्यात आले होते. ‘मी एका कोरोनाबाधिताचा शोध घेत असून पैसे द्यायलाही तयार आहे’ असे एका लसविरोधी व्यक्तीने ऑनलाइन व्यासपीठावर पोस्ट केली होती. अशाप्रकारचे लोक कोविड पाटर्य़ांच्या शोधात फिरत आहेत.