30 जून 2022 पर्यंत राहणार ऍटर्नी जनरलपदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकारने ऍटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढविला आहे. ऍटर्नी जनरल वेणुगोपाल आता 30 जून 2022 पर्यंत सेवा देत राहणार आहेत. वेणुगोपाल यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ मंगळवारी संपुष्टात येणार होता, जो सरकारने आता वाढविला आहे. नियुक्ती विषयक मंत्रिमंडळ समितीने सोमवारी यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
केंद्र सरकारने याचबरोबर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचा कार्यकाळही 3 वर्षांनी वाढविला आहे. नवा कार्यकाळ 1 जुलैपासून लागू होणार आहे. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयासाठी पाच अतिरिक्त सॉलिसिटरल जनरलांचा कार्यकाळही तीन वर्षांनी वाढविण्यात आला आहे. यात विक्रमजीत बॅनर्जी, अमन लेखी, माधवी गोदारिया दीवान, के.एम. नटराज आणि संजय जैन यांचा समावेश आहे.
उच्च न्यायालयांसाठी देखील दोन अतिरिक्त सॉलिसिटर जनरलांचा कार्यकाळ तीन वर्षांनीच वाढविण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयासाठी अनिल सी. सिंग आणि पंजाब तसेच हरियाणा उच्च न्यायालयासाठी सत्यपाल जैन यांचा यात समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयासाठी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून 6 वरिष्ठ अधिवक्त्यांची तीन वर्षांसाठी नियुक्तीची घोषण करण्यात आली आहे.
89 वर्षीय के.के. वेणुगोपाल यांनी जून 2017 मध्ये ऍटर्नी जनरल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. 2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱया कार्यकाळातही वेणुगोपाल यांनाच या पदाकरता पसंती देण्यात आली आहे.