वृत्तसंस्था/ लंडन
लंकेचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेसाठी नियुक्त करण्यात आलेले आयसीसीचे सामनाधिकारी फिल व्हिटिकेस यांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती रविवारी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने दिली आहे.
56 वर्षीय सामनाधिकारी व्हिटिकेस यांची कोरोना चाचणी घेण्यात आली आणि त्यामध्ये ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. व्हिटिकेस यांना आता 10 दिवसांच्या कालावधीसाठी आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. इंग्लंड आणि लंका या दोन्ही संघातील कोणत्याही सदस्याचा व्हिटिकेस यांच्याशी संपर्क आला नसल्याचे सांगण्यात आले. व्हिटिकेस यांना 25 जूनपासून 10 दिवसांच्या कालावधीकरिता सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान इंग्लंड आणि लंका यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 29 जूनपासून प्रारंभ होत असून या घटनेमुळे या मालिकेत कोणताही अडथळा येणार नाही, असे सांगण्यात आले. इंग्लंडने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत लंकेचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला आहे.