वार्ताहर / राजापूर
राजापूर तालुक्यातील वेत्ये समुद्र किनारी कासवमित्र गोकूळ जाधव यांना पुन्हा एकदा ऑलिव्ह रिडले जातीच्या समुद्री कासवांची 110 अंडी सापडली आहेत. कासवमित्र जाधव यांनी दोन आठवडय़ांमध्ये समुद्री कासवांची सुमारे 385 अंडी संरक्षित केली आहेत.
राजापूर तालुक्यातील वेत्ये आणि माडबन समुद्र किनारी मागील काही दिवसांपासून सातत्याने ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची अंडी सापडत आहेत. कासवांच्या अंडय़ांचे संरक्षण व्हावे याकरीता मागील काही वर्षांपासून वनविभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱया कासव संवर्धन मोहिमेंतर्गत कासवमित्र या अंडय़ांचे संरक्षण करत आहेत. वेत्ये समुद्रकिनारी कासवमित्र जाधव हे नेहमी सकाळच्या सत्रात समुद्र किनारी फेरफटका मारतात.
जानेवारी महिन्याच्या शेवटी जाधव यांनी 100 कासवांची अंडी संरक्षित केली होती. त्यानंतर याच आठवडय़ात मंगळवारी दोन ठिकाणी 175 कासवाची अंडी आढळून आली. त्यानंतर पुन्हा एकदा 110 अंडी सापडली आहे. त्यांनी तात्काळ राजापूर वनविभागाच्या अधिकाऱयांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर किनाऱयावरील वन्य प्राणी व मानवापासून संरक्षण करण्यासाठी अंडी घरटय़ामध्ये संरक्षित केली आहेत. आतापर्यंत जाधव यांनी 385 अंडी संरक्षित केली आहेत. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.