प्रतिनिधी/ म्हापसा
इनरव्हील क्लब ऑफ म्हापसा एलिट व वेर्ला-काणका पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वेर्ला-काणका पंचायतीच्या इमारतीत सुपर स्पेशॅलीटी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर शिबिर सकाळी 8 ते दुपारी 2 वा. पर्यत चालले. स्थानिक तसेच आजूबाजूच्या नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. विविध क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांनी या शिबिरात तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले. डॉ. सागर रेडकर, डॉ. सोफिया रॉड्रिग्स, डॉ. सराह, जॉर्ज, डॉ. ओसवाल्ड डिसोझा, डॉ. रेखा अवनी, डॉ. वीरजा वेर्लेकर, डॉ. पृथ्वी आमोणकर, डॉ. पी. व्ही. नाईक, डॉ. सिद्धेश बांदेकर, आहारतज्ञ जोवीलो पिंटो, रोशॅल परेरा यांचा यात सहभाग होता.
या शिबिराचे उद्घाटन स्थानिक आमदार तथा कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांच्या हस्ते झाले. अशा शिबिराचा जास्तीतजास्त लोकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. हा उपक्रम म्हणजे एक सत्कर्म असून त्याचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी कौतुक केले.
उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर, इनरव्हीलच्या अध्यक्ष राणी बुर्ये, सचिव अल्पना परूळेकर, सरपंच मिल्टन मार्कीस तसेच अन्य पंचसदस्य, समन्वयक तथा म्हापसा रोटरीयनचे माजी अध्यक्ष प्रताप परब उपस्थित होते.
अशाप्रकारचे उपक्रम आपण नियमित राबवित असल्याचे सरपंच मिल्टन मार्कीस यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले. सूत्रसंचालन त्यांनीच केले. मान्यवरांना स्मृतिचिन्हे यावेळी प्रदान करण्यात आली.