तीन मिठाई दुकाने, पूजा साहित्य दुकानांवर कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन संपल्यानंतर दि. 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास जिल्हाधिकाऱयांनी परवानगी दिलेली आहे. तरीही वेळेअगोदर व त्यानंतर दुकाने उघडी ठेवल्याप्रकरणी सातारा शहरातील चार दुकानदारांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे कर्मचारी दि. 1 रोजी ईदनिमित्त बंदोबस्तावर असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या समवेत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी सकाळी 8 वाजता मोती चौकातील असलेली दोन्ही लाटकर स्वीट मार्ट ही मिठाईची दुकाने सुरु होती. त्यामुळे या दोन्ही दुकानांचे मालक अजय मोहन लाटकर (वय 55, रा. शुक्रवार पेठ, सातारा) व पवन शरद लाटकर (वय 26, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) तसेच चंदू मिठाईवाले दुकानाचे मालक चंद्रहास जाधव (वय 49 रा. भवानी पेठ, मोती चौक, सातारा) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तर मोती चौकातील श्रीराम पूजा भांडार हे दुकान वेळेअगोदर उघडे ठेवल्याप्रकरणी दुकानमालक श्रीराम नामदेवराव कोटगिरे (वय 35 रा. सोमवार पेठ, सातारा) यांच्यावर देखील आदेशाचा भंग करून मिठाईविक्री व धार्मिक पूजा साहित्याची विक्री केल्याने शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कॉन्स्टेबल ओंकार यादव यांनी तक्रार दिली असून पोलीस अधिक तपास करत आहेत..