दांडेली येथे युद्धस्तरावर काम सुरू : अधिकाऱयांकडून पाहणी
प्रतिनिधी /दांडेली
वेस्ट कोस्ट पेपर मिलच्यावतीने दांडेली सार्वजनिक दवाखान्यात ऑक्सिजन प्लांट उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. सदर प्लांटसाठी वेस्ट कोस्ट पेपर मिलच्या व्यवस्थापक मंडळाने 90 लाख रुपये मंजूर केले आहेत. या ऑक्सिजन प्लांटचे काम युद्धस्तरावर सुरू करण्यात आले आहे. याची शनिवारी अधिकाऱयांनी पाहणी केली.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून दांडेली तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढले होते. या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू लागली होती. दांडेलीतील जनता, जनप्रतिनिधी व सामाजिक संघटनांनी ऑक्सिजन प्लांटची मागणी केली होती. यामुळे कंपनी व्यवस्थापक मंडळाने सामाजिक बांधिलकी योजनेंतर्गत ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी तात्काळ 90 लाख रुपये मंजूर करून काम सुरू केले आहे. या प्लांटची इमारत व त्यावरील 25 फुटाचे छप्परसुद्धा बांधून पूर्ण झाले आहे. लवकरच या जागेवर ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रसामग्री बसविण्यात येणार आहे, असे कंपनीचे पीआरओ राजेश तिवारी यांनी सांगितले.
कारवार जिल्हा प्रांतपाल (एसी) विद्याश्री चंदरगी यांनी शनिवारी ऑक्सिजन प्लांटच्या प्रगतिपथावरील कामाची पाहणी केली. आरोग्य अधिकाऱयांना काही प्रमुख सूचना दिल्या. यावेळी दांडेली तहसीलदार शैलेश परमानंद, दांडेली सार्वजनिक दवाखान्याचे प्रमुख वैद्याधिकारी राजेश प्रसाद व वेस्ट कोस्ट पेपर मिलचे पीआरओ राजेश तिवारी उपस्थित होते.