मंत्री मायकल लोबो यांनी घेतला समाचार
प्रतिनिधी / म्हापसा
पर्वरीचे आमदार वैफल्यग्रस्त झालेले असून मंत्रीपद नसल्याने ते काहीही बोलू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांना ‘पप्पू’ म्हणू लागले आहेत तर कळंगूट मध्ये कोविड 19 टुरिझम सुरू केल्याचा आरोप करीत आहेत. त्यांच्या खोटारडेपणाचा कळस जनतेला कळून चुकला आहे. जनताच त्यांना योग्य धडा शिकवणार, अशा शब्दात कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी खंवटे यांचा समाचार घेतला. कळंगूट येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खंवटे यांनी थोडा संयम ठेवावा अन्यथा जनताच पुढील निवडणुकीत घरी पाठवेल. त्यांनी धर्मांतराच्या नावाखाली लोकांमध्ये फुट घालण्याचा प्रयत्न करू नये. ते आपले जवळचे मित्र आहेत. पण आज त्यांना मित्र म्हणायलाही लाज वाटत आहे. ते काय बोलतात ते त्यांनाच माहित नाही. आपण त्यांच्या विरोधात कोविड बाबत नाहक बदनामी केल्याने कळंगूट पोलिस स्थानकात तक्रार देणार होता, परंतु आता गप्प राहतो, असे मायकल लोबो म्हणाले.
रोहन खंवटे यांनी आपल्या मंत्रीपदाच्या काळात किती औद्योगिक वसाहती आणल्या आणि किती जणांना नोकऱया दिल्या. या काळात त्यांना काय केले, असा सवाल लोबो यांनी यावेळी केला. कळंगूट मतदारसंघात कोविड टुरिझम सुरू केले. हे त्यांनी कळंगूट मध्ये येऊन दाखवावे. ते वैफल्यग्रस्त का झाले. ते खोटे का बोलत आहेत. ते शुद्ध दुधासारखे समजात. त्यांनी खोटारडेपणा सोडावा. लोकांचा विश्वासघात करू नये अन्यथा जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल, असे मंत्री लोबो म्हणाले.