प्रतिनिधी/ बेळगाव
राज्यातील विविध महापालिका व नगरपालिकांची पुनर्रचना करून आरक्षण जाहीर करावे व येत्या पाच महिन्यात निवडणुका घ्याव्यात, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका घेण्याच्यादृष्टीने प्रशासनाने हालचाली चालविल्या आहेत. बेळगाव महापालिकेची वॉर्ड पुनर्रचना करण्यासाठी आवश्यक खलबते सुरू झाली आहेत. महसूल निरीक्षकांकडून माहिती घेऊन वॉर्ड पुनर्रचना करण्यासाठी कारवाई सुरू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
राज्यातील काही महापालिका व नगरपालिकांची पुनर्रचना करून आरक्षण चुकीचे झाले असल्याने आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामुळे वॉर्ड पुनर्रचना नव्याने करून आरक्षण जाहीर केल्यानंतरच निवडणुका घ्याव्यात, अशी सूचना उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2019 मध्ये केली होती. पण ही कारवाई अद्याप झाली नाही. नगरविकास खात्याने याबाबत कोणतीच अधिसूचना जारी केली नसल्याने महापालिकेने वॉर्ड पुनर्रचनेचे काम केले नाही. हुबळी-धारवाड महापालिकेची निवडणूक घेण्यासाठी वॉर्ड पुनर्रचना करण्याचे काम करण्यात आले होते. पण पुढील कारवाई झाली नाही. त्यामुळे याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेची सुनावणी नुकतीच झाली असून, वॉर्ड पुनर्रचना नव्याने करून आरक्षण जाहीर करावे, तसेच पाच महिन्यांच्या आत निवडणुका घ्याव्यात, अशी सूचना केली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका घेण्याच्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे.
बेळगाव महापालिका वॉर्ड रचनेबाबत आक्षेप घेण्यात आल्याने यापूर्वी करण्यात आलेली वॉर्ड पुनर्रचना रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने वॉर्ड पुनर्रचना करावी लागणार आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने आवश्यक तयारी सुरू केली आहे. सध्या मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे वॉर्ड पुनर्रचनेचे कामदेखील सुरू करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. महापालिकेच्या जुन्या वॉर्डची हद्द जाणून घेऊन नव्याने करण्यासाठी आवश्यक माहिती घेण्यात येत आहे. वॉर्ड हद्द निश्चितीसाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. याकरिता महसूल निरीक्षकांची मदत घेण्यात येत आहे. महापालिका निवडणूक घेण्यासाठी वॉर्ड पुनर्रचना करून आरक्षण जाहीर करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पावले उचलण्यात आल्याचे समजते. वॉर्ड पुनर्रचना करण्याचे काम अतिशय गुप्तपणे करण्यात येत असून, याबाबत कोणतीही माहिती प्रसार माध्यमांना देण्यात येऊ नये, अशी सूचना करण्यात आल्याचे समजते.