संजू सॅमसन या युवा खेळाडू गुणवत्ता जणू ठासून भरली आहे आणि त्यामुळे सातत्य कायम राखले तर तो भारतीय क्रिकेट संघातर्फे सर्व क्रिकेट प्रकारातून निश्चितच खेळेल, असा अंदाज माजी दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने व्यक्त केला आहे. केरळच्या या उत्तम फलंदाजाने मागील काही वर्षात राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. पण, दोन-एक अर्धशतकी खेळापुरताच त्याचा प्रवास मर्यादित राहिला आहे. वॉर्नला मात्र हा खेळाडू निश्चितच सर्व क्रिकेट प्रकारातून खेळेल, असा विश्वास वाटतो. शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सचा आयपीएल विजेता माजी कर्णधार असून सध्या तो संघ प्रवर्तक व ब्रँड ऍम्बेसिडरपदी कार्यरत आहे.
‘संजू सॅमसन यंदा सातत्यपूर्ण प्रदर्शन साकारेल, असा मला विश्वास वाटतो. असे झाले तर तो भारतातर्फे तिन्ही क्रिकेट प्रकारातील संघांचे प्रतिनिधीत्व करताना दिसून येईल. संघातील सर्वोत्तम खेळाडूंनी सर्वाधिक चेंडूंचा सामना करावा, असे माझे मत असते आणि या निकषावर जोस बटलर, स्टीव्ह स्मिथ व संजू सॅमसन हे आमचे अनुक्रमे सर्वोत्तम फलंदाज आहेत’, असे वॉर्न वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला.
‘बेन स्टोक्स सध्या आमच्या संघात उपलब्ध नाही आणि त्याची खूप उणीव जाणवते. पण, या घडीला तो त्याच्या कुटुंबासमवेत असणे आवश्यक आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर तो आमच्या संघात दाखल होईल, अशी अपेक्षा आहे’, याचा वॉर्नने पुढे उल्लेख केला.