रशियाच्या बॉम्बवर्षावादरम्यान पोहोचली पोलंडमध्ये युक्रेनच्या महिला सर्वात धैर्यवान असल्याचा संदेश
रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केला, युक्रेनला स्वतःच्या अटींवर झुकवू असा पुतीन यांचा यामागे विचार होता. राजधानी कीव्हमध्ये स्वतःच्या हातचे बाहुलेले असलेले सरकार आणण्याचा त्यांचा डाव अद्याप यशस्वी ठरलेला नाही. रशियाने युक्रेनचे नुकसान केले असले तरीही त्यावर विजय मिळविलेला नाही. यामागे तेथील लोकांचा निर्धार कारणीभूत आहे. अशीच एक शूर महिला आहे ओक्साना कोनोनेट्स.
मॉडेल असणारी ओक्साना एक दशकापासून व्हिलचेअरवर आहे. तरीही ती युक्रेनियन महिला जगात सर्वात शक्तिशाली असतात, हे दाखवून देऊ इच्छिते. 19 वर्षांची असताना ओक्साना पाचव्या मजल्यावरून खाली कोसळली होती. पाठीच्या कण्याला मार बसल्याने तिला अर्धांगवायू झाला होता. त्या दुर्घटनेपूर्वी ती मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची. लहानपणापासून ती जिम्नॅस्टिक आणि ऐरोबिक्समध्ये अत्यंत सक्रीय होती. परंतु अचानक तिला व्हिलचेअरला खिळून रहावे लागले. पण एका व्हिलचेअरवरील मॉडेलला पाहून ओक्सानाने ती करू शकते तर मी का नाही असा प्रश्न स्वतःला विचारला. दोन वर्षांपर्यंत स्वतःला निरुपयोगी समजून बसलेल्या ओक्सानाने 2015 मध्ये मॉडेलिंगला सुरुवात केली. 26 फेब्रुवारी रोजी फॅशन शोकरता लॉस एंजिलिस येथे जाणार होते. परंतु 24 फेब्रुवारीलाच रशियाने युक्रेनवर हल्ला चढविला. बॉम्बवर्षाव सुरू होताच आईने आमचे सामान गोळा केले आणि आम्ही रेल्वेस्थानकाच्या दिशेने पळालो. कुठल्या दिशेने जायचे आहे माहित नव्हते. एका रेल्वेत रिकामी जागा मिळाल्याचे ती सांगते. 11 तासांचा प्रवास, माझीव्हिलचेअरही तुटली, प्रवासादरम्यान अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पोलंडला जाणाऱया गर्दीयुक्त रेल्वेत आम्ही 11 तास काढले. माझ्या व्हिलचेअरला रेल्वेत आणणे अत्यंत अवघड होते, त्याचा एक हिस्सा तुटला होता. त्या रेल्वेत एक 90 वर्षांची महिला स्वतःच्या पाळीव प्राण्यांना कवटाळून होती, असे ओक्सानाने म्हटले आहे.
जगाला सांगू इच्छिते…..
युक्रेनियन महिला अत्यंत धाडसी असतात, युद्ध सुरू झाल्यावर युक्रेनच्या महिला किती शक्तिशाली असतात, हे दाखवू इच्छित आहे. माझा देश सध्या वाईट कालखंडातून जात आहे. आमच्या देशाला सध्या वैद्यकीय मदतीची गरज असल्याचे तिने म्हटले आहे.