नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
वादग्रस्त वक्तव्यसाठी नेहमी चर्चेत असणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये त्या एखाद्या प्रोफेशनल खेळाडूप्रमाणे बास्केटबॉल खेळताना दिसत आहे. नेहमी व्हिलचेअरवर दिसणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना बास्केटबॉल खेळताना पाहून नेटकऱ्यांना मात्र आश्चर्यांचा धक्काच बसला आहे. काही नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. त्यांच्या या व्हिडिओवर काँग्रेसने मात्र प्रश्न उपस्थित केला आहे. अनेक महिने व्हिलचेअरवर फिरणाऱ्या साध्वी अचानक एवढ्या फिट कशा झाल्या असा सवाल काँग्रेसने केला आहे.
काँग्रेस नेते नरेंद्र सलूजा यांनी साध्वी यांचा व्हिडीओ टि्वट करत म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी ज्या साध्वी प्रज्ञा व्हिलचेअरच्या आधारावरच होत्या. ज्यांना धड नीट उभंही राहता येत नव्हतं. त्या अचानक एवढ्या बऱ्या कशा झाल्या आणि थेट बॉस्केटबॉल खेळायला लागल्या. कारण आतापर्यंत त्यांना दुखापत झाल्याने त्या चालू शकत नव्हत्या एवढंच माहित होतं. तरीही देव त्यांना नेहमी सुदृढ ठेवो अशी प्रार्थनाही सलूजा यांनी या टि्वटमध्ये केली आहे.
साध्वी प्रज्ञा गुरुवारी १ जुलै रोजी मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ येथे येथील शक्ती नगरमध्ये बास्केटबॉल मैदानात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. पण कार्यक्रमानंतर त्या थेट बास्केटबॉल कोर्टवर गेल्या आणि अनुभवी खेळाडूप्रमाणे बॉस्केटबॉल खेळू लागल्या. साध्वी बॉस्केटबॉल खेळत असल्याने तेथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच धक्का बसला. त्यानंतर अनेकांनी साध्वींचे बास्केटबॉल खेळतानाचे फोटो व व्हिडीओ काढले. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी देखील साध्वी प्रज्ञा यांचे हे रूप पाहून टीका केली आहे.