वृत्तसंस्था/ ढाक्का
बांगलादेश क्रिकेट संघाचे फिरकी गोलंदाज प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी आपल्याला मिळणाऱया मानधनातील काही रक्कम बांगलादेश क्रिकेट मंडळात कमी पगारात काम करणाऱया कर्मचाऱयांना देण्याची विनंती केली आहे.
कोरोना महामारी संकटामुळे क्रिकेट बांगलादेशच्या काही कर्मचाऱयांना वतेन कपात केल्याने आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी व्हेटोरी यांनी आपल्या वेतनातील काही रक्कम देण्यात यावी, असे बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या क्रिकेट समितीला कळविले आहे. या निर्णया संदर्भात व्हेटोरी यांनी बांगलादेश क्रिकेट मंडळाचे सीईओ निजामुद्दीन चौधरी यांच्याशी अधिकृत संपर्क साधून ही विनंती केली आहे. मात्र त्यांच्या एकूण वेतनातील किती रक्कम मदत म्हणून देणार, हे स्पष्ट करण्यात आले नसल्याचे बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले. बांगलादेश क्रिकेट मंडळाबरोबर व्हेटोरी यांचा 100 दिवसांसाठी करार झाला असून या करारापोटी त्यांना 250,000 अमेरिकन डॉलर्स मानधन मिळत आहे. बांगलादेश क्रिकेट मंडळाने आतापर्यंत 428,000 अमेरिकन डॉलर्सची मदत देशातील आर्थिक समस्या असलेल्या क्रिकेटपटूंना केली आहे.