शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने
पोलीस निरीक्षकांनी पदाधिकाऱयांना आवरले
कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले
प्रतिनिधी / दोडामार्ग:
काही व्हॉट्सऍप ग्रुपवरील एका गरमागरम राजकीय चर्चेचे तीव्र पडसाद रविवारी दोडामार्गात उमटले. त्या चर्चेच्या अनुषंगाने ग्रुपवर आव्हान-प्रतिआव्हान दिल्याने शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी येथील मुख्य चौकात आमने-सामने आले. परंतु पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांनी संभाव्य राडा टाळत दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आवरले.
दोडामार्ग-बांदा व दोडामार्ग-वीजघर या दोन प्रमुख राज्यमार्गासोबतच दोडामार्ग तालुक्यातील अन्य रस्त्यांच्या दुरवस्थेवरून काही व्हॉट्सऍप ग्रुपवर शनिवारी रात्री जोरदार ‘चर्चा’ झाल्या. या चर्चांची परिणीती सत्ताधारी शिवसेना व विरोधी पक्ष भाजप या दोहोंमध्ये एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देण्यात झाली. एकमेकांना बघून घेण्याचे, प्रसंगी ‘शिवप्रसाद’ देण्याचे इशारेही यावेळी देण्यात आले. व्हॉट्सऍप ग्रुपवर शनिवारी रात्री उशिरापर्यंत वाप्युद्ध सुरू होते. यावेळी समोरासमोर येण्याच्या आव्हानासोबत स्थळही देण्यात आले होते.
रविवारी आठवडा बाजारदिनी येथील चौकात शिवसेना व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत चौकात बघ्यांचीही गर्दी जमली होती. मात्र, संभाव्य राडय़ाची कुणकुण लागलेल्या पोलीस निरीक्षक आर. जी. नदाफ यांनी आपल्या कर्मचाऱयांसमवेत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना वेळीच बाजूला केले. त्यामुळे हे दोन्ही पक्ष आमने-सामने येण्यापासून टळले. मात्र, या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी सुरू होती. तसेच काहीजण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. मात्र, पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला. रविवारी दोडामार्गचा आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेत मोठी गर्दी होती. या गर्दीतील अनेक बघ्यांचे चांगले मनोरंजन झाले.
भाजपवाले खांद्यावर झेंडा घेऊन माघारी गेले – धुरी
पालकमंत्री उदय सामंत तसेच आमदार दीपक केसरकर या दोहोंवर भाजपच्या पदाधिकाऱयांकडून सोशल मीडिया तसेच अन्य मार्गाद्वारे गेल्या काही दिवसांपासून नाहक टीकाटिपणी सुरू आहे. दोडामार्ग तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी तसेच अन्य सोईसुविधा यासाठी राज्य शासनाकडून भरघोस निधी दिला जातो. असे असताना आमच्या पालकमंत्री, आमदार यांच्यावर काल व्हॉट्सऍप ग्रुपवर नाहक चिखलफेक करण्यात आली. त्या चिखलफेक करणाऱया विरोधी पक्ष भाजपला आम्ही रविवारी सकाळी शिवसेनेचा ‘शिवप्रसाद’ घेण्यासाठी बोलावले होते. परंतु ही मंडळी आमच्यासमोर न येता आपल्या पक्षाचा झेंडा खांद्यावर ठेवून पळाली. ‘अरेला कारे’ म्हणण्याचे संस्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून आम्हाला मिळाले आहेत. आमच्या मंत्री, आमदारांवर नाहक टीका करणाऱयांना ‘शिवप्रसाद’ देण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत, असे शिवसेना तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी स्पष्ट केले.
आव्हान देणारेच पळून गेले – एकनाथ नाडकर्णी
शिवसेनेचे पालकमंत्री उदय सामंत व आमदार दीपक केसरकर या दोघांकडून दोडामार्ग तालुक्यातील रस्ते व अन्य विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे आम्ही विरोधी पक्ष या नात्याने वेळोवेळी प्रसारमाध्यमातून जनतेला दाखवून दिले आहे. ते त्यांच्या अर्थात सत्ताधारी शिवसेनेच्या जखमेवर मीठ चेळल्यासारखे झाल्याने त्यांनी आम्हाला येथील चौकात येण्याचे आव्हान दिले होते. त्यानुसार आम्ही सर्व भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते दिलेल्या वेळेत आलो होतो. परंतु आव्हाने देणारे अखेर पळून जात त्यांनी पोलिसांचा आसरा घेतला. जर तो घेतला नसता तर त्यांची हाडे खिळखिळी झाली असती, असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी सांगितले.