दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्ली उच्च न्यायालयाने व्हॉट्सऍप ग्रुप्सच्या माध्यमातून वृत्तपत्राचे ई-पेपर प्रसारित करण्यावर तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. ई-पेपर्स व्हॉट्सऍप ग्रुप्सच्या माध्यमातून बेकायदेशीर पद्धतीने प्रसारित करण्याच्या विरोधात एका वृत्तपत्र समुहाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश संजीव नरुला यांच्या खंडपीठाने वृत्तपत्र समुहाच्या बाजूने अंतरिम आदेश दिला आहे.
ई-पेपर प्रसारित करणारे व्हॉट्सऍप ग्रुप्स ब्लॉक केले जावेत किंवा ते बंद करण्यात यावेत असा निर्देशही उच्च न्यायालयाने दिला आहे. आता याप्रकरणी 2 मे 2022 रोजी सुनावणी होणार आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अवैध स्वरुपात ई-पेपर प्रसारित करणाऱया व्हॉट्सऍप ग्रुप्सच्या ऍडमिनना उच्च न्यायालयाने स्वतःच्या आदेशाद्वारे नोटीस बजावली आहे. या व्हॉट्सऍप ग्रुप्सच्या ऍडमिनची ओळख त्यांच्या मोबाईल क्रमांकाद्वारे झाली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय दूरसंचार विभाग आणि केंद्र सरकारलाही या प्रकरणी नोटीस बजावली आहे.
वृत्तपत्र समुहाने कॉपीराईट आणि नोंदणीकृत टेडमार्कचे उल्लंघन करत असलेल्या व्हॉट्सऍप ग्रुप्सना ब्लॉक करण्यासाठी व्हॉट्सऍपला कायदेशीर नोटीस पाठविली होती. अनेक वृत्तपत्र समूह सब्सक्रिप्शन मॉडेलच्या माध्यमातून स्वतःचे अधिकृत संकेतस्थळ (वेबसाईट) आणि मोबाईल ऍपवर ई-पेपर्स पाहण्याची सुविधा पुरवत आहेत. या ई-पेपर्सना अनुमतीशिवाय अन्य माध्यमे किंवा प्लॅटफॉर्म्सवर प्रसारित करणे बेकायदेशीर कृत्य आहे.