पर्यटक म्हणून आलेल्या 5 संशयितांना अटक, कळंगूटमधून 2 लाख 97 हजारांच्या नोटा जप्त
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱया टोळीचा पणजी पोलिसांनी काल सोमवारी पर्दाफाश केला असून पाच संशयितांना अटक केली आहे. अटक केलेले सर्व संशयित चंदीगड येथील आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 2 लाख 96 हजार 400 रुपये किमंतीच्या नोटा जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या नोटांमध्ये 100, 200 व 2000 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.
संशयिताच्या विरोधात भादंसंच्या 489 ए, 489 बी व 489 सी कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये राजदीप, गंगादीप, हरजित, राहूल व अनुराग यांचा समावेश आहे, ही मुख्य टोळी असून नोटा बाजारात उतरविण्यासाठी ते अज्ञानी महिला व बालकांचा वापर करत होते. त्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केलेला नाही.
पाच दिवसांपासून सुरु होता कसून शोध
गोव्यात पर्यटक म्हणून आलेली एक टोळी बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती पणजी पोलिसांना पाच दिवसांपूर्वी मिळाली होती. पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते.
छाप्यात बनावट नोटांसह 11 जणांना घेतले ताब्यात
सोमवारी पणजीत आइस्क्रिम खरेदी करण्यासाठी दुकानात आलेल्या महिलेने बनावट नोट दिल्यामुळे पोलिसांना या प्रकरणात यश आले. पणजीतील त्या महिलेस ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कळंगूटमधील एका हॉटेलवर छापा मारून बनावट नोटांसह सर्व संशयितांनाही अटक केली. एकूण 11 जणांना ताब्यात घेतले होते. त्यात पाच पुरुष चार महिला व दोन मुलांचा समावेश होता. अकरापैकी पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आज त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल.
गोव्यात बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने संशयितांची ही चंदीगड येथील टोळी एका आठडय़ापूर्वीच गोव्यात आली होती. त्यांनी आपल्या सोबत महिलांना तसेच मुलांनाही आणले होते. महिला दुकानावर जाऊन काही तरी खरेदी करायच्या आणि बनावट नोटा चलनात आणायच्या. पर्वरी व पणजी परिसरात त्यांनी बनावट नोटा चलनात आणल्याचे तपासात उघड झाले आहे.
पणजीतील दुकानात घडले आइस्क्रिम नाटय़
सोमवारी सकाळी पणजीतील एका आईक्रीम दुकानात संशयितांपैकी महिला आली. शंभर रुपयांची आइक्रिम घेतली आणि दोन हजार रुपयांची नोट दुकानदाला दिली. बनावट नोटांबाबत पोलिसांनी दुकानदारांना अगोदरच कल्पना दिलेली असल्याने या दुकानदाराला त्याला दिलेल्या नोटीबाबत संशय आल्याने त्याने पोलिसांना कळविले. पणजी पोलिसांनी त्वरित संशयिताला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता कंळगूटमध्ये टोळी असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे छापा मारुन पोलिसांनी सर्वाना ताब्यात घेतले.