भारताविरुद्ध पहिली कसोटी – पहिल्या दिवसअखेर इंग्लंड 3 बाद 263
चेन्नई / वृत्तसंस्था
कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना खेळत असलेल्या जो रुटने भारताविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 197 चेंडूत नाबाद 128 धावांचा शतकी तडाखा दिल्यानंतर पाहुण्या इंग्लिश संघाने 3 बाद 263 धावांपर्यंत जोरदार मजल मारली. सलामीवीर डॉम सिबलीसमवेत (12 चौकारांसह 87) रुटने तिसऱया गडय़ासाठी साकारलेली 200 धावांची भागीदारी इंग्लंडच्या डावाचे ठळक वैशिष्टय़ ठरले. भारतीय संघातर्फे बुमराहने 40 धावात 2 तर अश्विनने 68 धावात 1 फलंदाज बाद केला.
आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱया रुटने 20 वे शतक झळकावताना फिरकी गोलंदाजांवरील आपली हुकूमत आणखी एकदा अधोरेखित केली. त्याच्या 197 चेंडूतील खेळीत 14 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. वैयक्तिक कारकिर्दीतील 100 व्या सामन्यात शतक झळकावणारा तो इतिहासातील 9 वा फलंदाज ठरला.
रुटने अपेक्षेप्रमाणे फिरकी गोलंदाजांविरुद्ध स्वीप करण्याचा सिलसिला सुरु केला आणि तो कमालीचा यशस्वी देखील झाला. प्रंट ऑफ द स्क्वेअरला स्लॉग स्वीप, स्क्वेअरच्या दिशेने पारंपरिक स्वीप, स्क्वेअरच्या मागे पॅडल स्वीप आणि आवश्यकतेनुसार स्विच-हिट स्वीप फटके लगावत त्याने फिरकी गोलंदाजांच्या आव्हानातील जणू हवाच काढून घेतली. योगायोग म्हणजे त्याने या सामन्यातील पहिला षटकार अश्विनच्या गोलंदाजीवर स्लॉग स्वीप फटक्यावरच वसूल केला.
रुटने यादरम्यान युवा सहकारी डॉम सिबलीला देखील मोलाचे मार्गदर्शन केले. सिबलीने 286 चेंडूत 12 चौकारांसह 87 धावांचे योगदान दिले. जसप्रित बुमराहने दिवसातील शेवटच्या षटकात सिबलीला बाद करत डोकेदुखी ठरलेली ही जोडी फोडली. येथेच दिवसाचा खेळही थांबवण्यात आला.
चेन्नईच्या पारंपरिक मंद खेळपट्टीवर रुटने अतिशय नियोजनबद्धरित्या आपली खेळी साकारली आणि इशांत-अश्विनसारख्या कसलेल्या गोलंदाजांना सहज निष्प्रभ केले. इशांतने नव्या चेंडूवर रिव्हर्स स्विंगचा उत्तम मारा केला असला तरी रुट-सिबलीला तो रोखू शकला नाही.
रुट-सिबलीची उत्तम रणनीती
इशांत, अश्विन व बुमराहला यशस्वीरित्या खेळून काढले तर विराटकडे वॉशिंग्टन सुंदर व नदीम या अननुभवी गोलंदाजांकडे चेंडू सोपवण्यावाचून दुसरा पर्याय नसेल, याची कल्पना असल्याने रुट व सिबली यांनी उत्तम रणनीती अंमलात आणली. खेळपट्टीकडून गोलंदाजांना काहीच मदत नसल्याने याचाही या जोडीला उत्तम लाभ घेता आला. या उभयतांनी पुढे सरसावत उत्तूंग फटके लगावण्याऐवजी चेंडू टप्प्यात येईतोवर प्रतीक्षा करणे पसंत केले. पहिल्या दिवसाच्या खेळात इंग्लंडने 28 चौकार, 1 षटकार फटकावले.
पहिल्या सत्रात दोन बळी गमावले, तो अपवाद वगळता पहिल्या दिवसाच्या खेळात इंग्लंडनेच पूर्ण वर्चस्व गाजवले. चेपॉकची लाल मातीची खेळपट्टी एरवी पहिल्या दिवशी जलद गोलंदाजांना अनुकूल असते. पण, अपवाद वगळता त्याचा लवलेशही आढळून आला नाही.
विराटने अश्विनला सातव्या षटकातच माऱयावर आणले. पण, सिबली व रोरी बर्न्स (33) यांनी पहिल्या दीड तासात 63 धावांची जोरदार सलामी दिली. बर्न्सला अश्विनने पंतकरवी झेलबाद केले तर लॉरेन्स खाते उघडण्यापूर्वीच बुमराहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पण, त्यानंतर दिवसातील तिसरा बळी मिळवण्यासाठी भारतीय गोलंदाजांना दिवसातील शेवटच्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. बुमराहने सिबलीला पायचीत करत ही जोडी फोडली आणि येथे दिवसाचा खेळही थांबवण्यात आला.
धावफलक
इंग्लंड पहिला डाव ः रोरी बर्न्स झे. पंत, गो. अश्विन 33 (60 चेंडूत 2 चौकार), डॉम सिबली पायचीत गो. बुमराह 87 (286 चेंडूत 12 चौकार), डॅन लॉरेन्स पायचीत गो. बुमराह 0 (5 चेंडू), जो रुट खेळत आहे 128 (197 चेंडूत 14 चौकार, 1 षटकार). अवांतर 15. एकूण 89.3 षटकात 3/263.
गडी बाद होण्याचा क्रम
1-63 (रोरी बर्न्स, 23.5), 2-63 (लॉरेन्स, 25.4), 3-263 (डॉम सिबली 89.3).
गोलंदाजी
इशांत शर्मा 15-3-27-0, जसप्रित बुमराह 18.3-2-40-2, रविचंद्रन अश्विन 24-2-68-1, शाहबाज नदीम 20-3-69-0, वॉशिंग्टन सुंदर 12-0-55-0.
100 सामने खेळणारा रुट 15 वा इंग्लिश क्रिकेटपटू
इंग्लिश कर्णधार जो रुट शुक्रवारी इंग्लंडतर्फे 100 कसोटी सामने खेळणारा 15 वा क्रिकेटपटू ठरला. येथील एम चिदंबरम स्टेडियमवर लढतीला सुरुवात होण्यापूर्वी इंग्लिश संघातील आणखी एक अनुभवी, अष्टपैलू बेन स्टोक्सने रुटला 100 क्रमांकाची कॅप प्रदान केली.
अलीकडेच संपन्न झालेल्या श्रीलंका दौऱयात इंग्लंडला 2-0 असा मालिकाविजय संपादन करुन देण्यात जो रुटचा सिंहाचा वाटा राहिला. त्याने दोन कसोटीत अनुक्रमे 228 व 186 धावांचे तडाखेबंद डाव साकारले व तो मालिकावीर पुरस्काराचा मानकरीही ठरला होता. जो रुटने 2012 मध्ये भारताविरुद्धच कसोटी पदार्पण केले असून कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आजवर 19 शतके, 49 अर्धशतकांसह 8249 धावा जमवल्या आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये तो इंग्लंडतर्फे सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी विराजमान आहे. त्याच्यापूर्वी माजी कर्णधार ऍलिस्टर कूक (12472 धावा), ग्रॅहम गूच (8900 धावा), ऍलेक स्टीवर्ट (8463 धावा) अनुक्रमे पहिल्या तीन स्थानी विराजमान आहेत.
दुखापतीमुळे अक्षर पटेल बाहेर, चहर, शाहबाजचा अंतिम क्षणी समावेश
फिरकी गोलंदाजी अष्टपैलू अक्षर पटेल डाव्या गुडघ्याला वेदना जाणवत असल्याने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर फेकला गेला. झारखंडचा डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीम व राजस्थानचा लेगस्पिनर दीपक चहर यांचा अंतिम क्षणी राखीव खेळाडूंमधून मुख्य संघात समावेश केला गेला.
‘अक्षर पटेल पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. यापूर्वी गुरुवारी सराव सत्रादरम्यान त्याने आपल्याला डाव्या गुडघ्यात वेदना जाणवत असल्याचे सांगितले होते’, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी पत्रकातून नमूद केले. अक्षर पटेलला यापूर्वी रविंद्र जडेजा दुखापतग्रस्त असल्याने संघात समाविष्ट केले गेले होते. ‘अखिल भारतीय निवड समितीने फिरकीपटू शाहबाज नदीम व राहुल चहर यांचा शुक्रवारी सामन्यापूर्वी मुख्य संघात समावेश केला. हे दोघेही यापूर्वी संभाव्य संघात नव्हते. पर्यायी खेळाडूंमध्ये त्यांचा समावेश होता, असे या पत्रकात पुढे म्हटले आहे.
विराटच्या खिलाडूवृत्तीचे रुटकडून कौतुक
तडाखेबंद शतक झळकावणाऱया जो रुटला या शतकी डावादरम्यान पायाला वेदना जाणवू लागल्या आणि एकवेळ तो जवळपास मैदानावर कोसळला, कळवळला. यावेळी लगेचच विराट कोहली त्याच्याजवळ गेला आणि त्याने हलके पायाला ओढत रुटच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला. दिवसाच्या अखेर रुटने माध्यमांशी बोलताना विराटच्या या खिलाडूवृत्तीची प्रशंसा केली. दुसऱया दिवसाच्या खेळात संघाला 600 ते 700 धावांचा टप्पा सर करुन देण्याचा प्रयत्न असेल, असेही तो आवर्जून म्हणाला.